विशेष निधीतून जिल्ह्याला २५ कोटी
By admin | Published: September 11, 2015 02:35 AM2015-09-11T02:35:54+5:302015-09-11T02:35:54+5:30
शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या ५ हजार ६४६ कृषी वीज जोडण्या देण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.
वर्धा : शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या ५ हजार ६४६ कृषी वीज जोडण्या देण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी विशेष निधीतून २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोबतच इन्फ्रा दोन साठीही २२ कोटी रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी महावितरण आणि पारेषणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महावितरण कंपनीमध्ये रिक्त असलेली पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याच्या दृष्टीने अधीक्षक अभियंत्यांनाच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. फिडर व्यवस्थापन योजनेंतर्गत कंत्राटदारांना यापुढे कामे न देता बेरोजगार अभियंत्यांमार्फतच ही कामे करण्यात येणार आहे. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमूख होऊन आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने विद्युत पुरवठा करावा. शिवाय त्यांना त्यांच्या मागणीनुसार सेवा पुरवाव्यात, अशा सूचना करताना ऊर्जा मंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नादुरूस्त रोहित्र त्वरित बदलण्याच्या व दुरूस्तीच्या दृष्टीने तालुकास्तरावर विशेष विभाग करण्यात येणार आहे. विजेमुळे ज्या शेतकऱ्यांचा अपघात झाला आहे, त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सांत्वन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार वीज पुरवठा, कृषी पंपांना वीज तसेच उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्यासाठी पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यातील नवीन कामांसाठी १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. महापारेषणतर्फे हिंगणघाट व वर्धा येथे २३ कोटी रुपयांची कामे सुरू आहे. रोहित्र क्षमतेत वाढ करणे, अतिरिक्त कॅपेसेटर बसविणे यासाठी मार्च अखेरपर्यंत ५६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. सोबतच नवीन कामांना ५० कोटी रुपयांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. महावितरणतर्फे जिल्ह्यात अधिक सक्षमपणे विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने हा जिल्हा चंद्रपूर सर्कलमधून नागपूर शहराशी जोडण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. सौरउर्जेवरील पंप उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही उर्जामंत्री बावणकुळे यांनी यावेळी केले.(जिल्हा प्रतिनिधी)