एकराला २५ किलो सोयाबीन, मळणीचा खर्च द्यायचा कसा?, शेतकऱ्यांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 01:04 PM2023-10-18T13:04:04+5:302023-10-18T13:04:26+5:30
रोगाच्या प्रादुर्भावाने तोंडचा घास हिरावला
सुधीर खडसे
समुद्रपूर (वर्धा) : यावर्षी सर्वप्रथम पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून, या परिसरातील मांडगावमध्ये सोयाबीनला एकरी २५ किलो उतारा आल्यामुळे शेतकऱ्यांना मळणीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे इतक्या कमी उत्पादनात शेतकरी जगणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करता यावा म्हणून सोयाबीन हे बोनस पीक समजले जाते. दिवाळीपूर्वी हे पीक घरी येत असून, यातून मिळणाऱ्या पैशांतून शेतकरी दिवाळी साजरी करतो. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ५ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये १ लाख २६ हजार हेक्टरवर सोयाबीन होते. त्यात आठही तालुक्यांत सर्वाधिक २४ हजार ४१४ हेक्टरवर एकट्या समुद्रपूर तालुक्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली.
सुरुवातीला आणि सोयाबीन फुलावर असताना पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव होऊन शेंगा लागण्यापूर्वीच सोयाबीन करपायला लागले. काही सोयाबीनला शेंगा लागल्या; परंतु त्या पूर्णत: भरल्याच नाही. त्यामुळे आता मळणी केल्यानंतर उत्पादनात कमालीची घट झाली. तालुक्यातील मांडगाव शिवारात तर एकरी २५ किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे. अशीच साधारणत: परिस्थिती जिल्ह्यातील इतरही भागातील असून, शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
रबी हंगामाची तयारी कुठून करणार?
रबीच्या हंगामाची तयारी खरिपाच्या उत्पादनावर अवलंबून असते. परंतु, खरिपातच सोयाबीनने धोका दिल्याने त्यासाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. आता रबीकरिता शेताची मशागत आणि बी-बियाणांची तडजोड आणि पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली आहे.
मी अल्पभूधारक शेतकरी असून, दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. याकरिता पैशांची तडजोड करुन शेती फुलविली. पण, आता मळणी केल्यानंतर दोन एकरात केवळ ५० किलो सोयाबीन झाल्याने खर्चही भरुन निघाला नाही. शासनाने एक रुपयात पीकविमा काढून दिला; परंतु अद्यापही पंचनामे झाले नाही.
- केशव तिमांडे, शेतकरी, मांडगाव