गॅस सिलिंडरसाठी तब्बल २५ किमीची पायपीट
By admin | Published: October 28, 2015 02:26 AM2015-10-28T02:26:52+5:302015-10-28T02:26:52+5:30
परिसरातील गॅस सिलिंडरधारकांना सिलिंडरकरिता तालुक्याच्या स्थळी जावे लागते.
श्रम व वेळचा अपव्यय : एकाच कर्मचाऱ्यावर मदार
कन्नवारग्राम : परिसरातील गॅस सिलिंडरधारकांना सिलिंडरकरिता तालुक्याच्या स्थळी जावे लागते. शिवाय तालुक्यात इन्डेन गॅस ही एजन्सी आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची रीघ लागते. परिणामी सिलिंडर मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. शिवाय प्रवास भाड्याचा भार येथील ग्राहकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे गावांमध्ये सिलिंडर पोहोचविण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
हा भाग जंगलव्याप्त असला तरी गॅसधारकांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरधारक कारंजा येथे त्यांच्या गावावरून जातात. याकरिता प्रवासाचा खर्च ग्राहकांना सहन करावा लागतो. सिलिंडरची घरपोच सेवा दिली जात नाही. ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. येथून दिवसाला २०० ते २५० गॅस सिलिंडरची पोहच केली जाते. या सगळ्या ग्राहकांसाठी एजन्सी मार्फत एकच व्यक्ती पैसे घेण्यासाठी व पावती देण्यासाठी नियुक्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांची ताटकळ होते. यातही २० ते २५ किलोमीटर अंतरावरून आलेल्या ग्राहकास नाहक दिवसभर ताटकळत दुकानासमोर बसावे लागते. या परिसरात एकही झाड नसल्याने ग्राहकांना उन्हात थांबाबे लागते. पिण्याचे पाणी नसल्याने दुरवरून आलेल्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. एजन्सीकडून ग्राहकांकरिता कोणत्याच सुविधा दिलेल्या नाही. ग्राहकांच्या सुविधेकरिता येथे आणखी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे. याशिवाय ग्रामीण भागात घरपोच सिलिंडर देण्याची मागणी परिसरातील ग्राहकांनी पुरवठा विभागाकडे केली आहे.(वार्ताहर)