जंगल सफारीतून २.५२ कोटींची ‘इन्कम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:01 AM2018-10-08T00:01:12+5:302018-10-08T00:01:58+5:30

जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला येथील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळच घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मागील १३ वर्षांमध्ये सुमारे ९० हजार ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तशी नोंदही घेण्यात आली आहे.

2.52 crore income from forest safari | जंगल सफारीतून २.५२ कोटींची ‘इन्कम’

जंगल सफारीतून २.५२ कोटींची ‘इन्कम’

Next
ठळक मुद्देबोर व्याघ्र प्रकल्प घालतोय अनेकांना भुरळ : १३ वर्षात ९० हजार पेक्षा जास्त पर्यटकांच्या भेटीची नोंद

रितेश वालदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला येथील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळच घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला मागील १३ वर्षांमध्ये सुमारे ९० हजार ५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तशी नोंदही घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या जंगल सफारीतून बोर व्याघ्र प्रकल्पाने आतापर्यंत १ कोटी ५२ लाख ८५ हजार ६९८ रुपयांची कमाई केली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आॅनलाईन व आॅफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पावसाळ्यात बंद करण्यात आलेल्या जंगल सफारीला २ आॅक्टोबर पासून सुरूवात झाली आहे.
सध्या स्थितीत आॅफलाईन सुविधा सुरू असली तरी तात्पूर्ती बंद केलेली आॅनलाईन सुविधाही पर्यटकांसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात दोन ठिकाणाहून जंगल सफारीसाठी सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील अडेगाव गेट तर वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथून जंगल सफारीचा आनंद घेता येतो. या दोन्ही ठिकाणावरून आॅनलाईन बुकींग सुविधा उपलब्ध आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प १५ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.कि.मी.) मध्ये पसरला आहे. यात बोर व न्यू बोर असे दोन भाग आहेत. वर्धा-नागपूर जिल्ह्यात त्याची सिमा आहे. या दोन भागात जंगल सफारीसाठी ४७ कि.मी. क्षेत्र (जागा) उपलब्ध करून दिले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात दोन पाळीत पर्यटनाची सोय आहे. यात सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत जंगल सफारीसाठी पर्यटकांना जंगल परिसरात सोडण्यात येते. दोन्ही गेटवरुन जंगल सफारीसाठी जिप्सी उपलब्ध असून पर्यटकांनी स्वत: आणलेल्या चारचाकी वाहनानेही त्यांना जंगल सफारीचा आनंद लुटता येतो.
इतकेच नव्हे तर बोर व्याघ्र प्रकल्पात इंत्थमभूत माहिती देण्यासाठी गाईडचीही व्यवस्था आहे. ते अगदी सोप्या शब्दात येथे येणाऱ्या पर्यटकांना या व्याघ्र प्रकल्पाबाबतची माहिती समजावून सांगतात. शिवाय सतर्कतेचा उद्देश केंद्रस्थानी ठेवून जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वेळोवेळी योग्य सूचनाही देतात. देशातील इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तूलनेत बोर व्याघ्र प्रकल्प हा लहान असला तरी तेथील जैवविविधता तसेच वन्यप्राणी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
सहज होतेय वन्यप्राण्यांचे दर्शन
बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्ग संपदा तसेच पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय, साबंर, चितळ, भेडकी, कोल्हे, खवल्या मांजर आदी वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होते. त्यामुळे येथे आल्यावर वयोवृद्धासह बच्चेकंपनीचाही आनंद गगनात न मावनाराच राहतो. त्यामुळेच विदर्भासह परिसरातील जिल्ह्यातील नागरिक जंगल सफारीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकाला पहिली पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ही दोन अभयारण्ये जोडण्याची किमया या बोर व्याघ्र प्रकल्पाने साधली आहे.
वनसंपदाही ठरतेय आकर्षक
बोर व्याघ्र प्रकल्पात साग, तेंदु, बेहडा, धावडा, टेंभुर्णी, तिवस, मोहन, आडन, अचारलेडी आदी प्रजातींची वनसंपदा आहे. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलामध्ये झुडपी वेलवर्गीय विविधता आहे.
व्याघ्र दर्शन सहज
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना व्याघ्र दर्शन सहज होते. शिवाय जैविक विविधतेने नटलेल्या या प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांना अस्वल, अंबिका व कॅटरिना नामक वाघिणीचे दर्शन होत असल्याचे पर्यटक सांगतात.
नैसर्गिक व कृत्रिम पानवठे
बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक व कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहेत. या पानवठ्यांवर मोर, लांडोर यासह विविध पक्षी व इतर वन्यप्राणी या प्रकल्पाला भेट देणाºया पर्यटकांना सहज निदर्शनास येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दीही वाढत आहे.

मंगळवार २ आॅक्टोबरपासून जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. तर १५ आॅक्टोबर पर्यंत आॅफलाईन सुविधा आहे. १६ आॅक्टोबरपासून ५० टक्के आॅनलाईन सुविधा सुरू करण्यात येईल. शिवाय १ नोव्हेंबरपासून १०० टक्के आॅनलाईन जंगलसफारीची आॅनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.
- के. वाय. तळेकर, वन परिक्षेत्र अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, बोरधरण.

Web Title: 2.52 crore income from forest safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.