२,५३१ आॅटोंची विना परवाना प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:52 PM2018-04-20T23:52:41+5:302018-04-20T23:52:41+5:30
जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे. या आॅटोतून प्रवास करणे अवैध असून वाहतूक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या आॅटोचालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्याकरिता एक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अवैधपणे चालणाºया रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे पूर्णता: बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास अशी वाहतूक मुळातच बेकायदेशीर असल्याने प्रवासी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग आॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बसस्थानक असो वा रेल्वे स्थानक या ठिकाणाहून प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविण्याकरिता आॅटो चालकांना परवाना देण्यात आला आहे. वर्धेत असा परवाना धारक आॅटोचालकांची संख्या २ हजार ९०० एवढी आहे. या आॅटो चालकांकडून दूरचे प्रवासी नेण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. शहरात मात्र खासगी आॅटो चालकांकडून प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे.
या मोहिमेत केवळ आॅटोच नाही तर इतर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत आॅटो चालकांना त्यांचा खासगी वाहनाचा परवाना रद्द करून तो प्रवासी वाहनाचा करण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
नव्या आॅटोंना मुभा, जुन्यांना दंड
उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आॅटो चालकांना काही शुल्क भरून त्यांचा परवाना प्रवासी करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. ही मुभा केवळ नवीन आॅटो चालकांना देण्यात आली आहे. जुन्या आॅटो चालकांना मात्र दंड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने अशीच मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत काही आॅटो चालकांनी त्यांचा परवाना बदलवून घेतला आहे. यामुळे इतर आॅटो चालकांनी आपला खासगी परवाना बदलवून घ्यावा.
अवैधपणे चालणाऱ्या आॅटो रिक्षांमधून प्रवासी वाहतूक बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास प्रवाशी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध आॅटो रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळावे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग अॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- विजय तिराणकर, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा.