२६२ शिक्षक करताहेत १९ प्रभागाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:09+5:30
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या ५० दिवसानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्यानंंतर प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आता शहरातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढायला लागली आहे. शहरालगत आतापर्यंत रामनगर, सुदामपुरी, हनुमाननगर, इतवारा व गोंडप्लॉट परिसरात रुग्ण आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात सध्या कोरोना विषाणूचा प्रकोप वाढायला लागल्याने खबरदारी म्हणून शहरातील प्रत्येक व्यक्तींची आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्याकरिता सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशानुसार नगरपालिकेने शहरातील १९ प्रभागातील प्रत्येक व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी २६२ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या शिक्षकांचे प्रगणक गट तयार केले असून त्याअंतर्गत आता सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे.
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या ५० दिवसानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्यानंंतर प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आता शहरातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढायला लागली आहे. शहरालगत आतापर्यंत रामनगर, सुदामपुरी, हनुमाननगर, इतवारा व गोंडप्लॉट परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आता पावसाळाही सुरू झाल्याने नगरपालिका हद्दीतील प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शहरातील तब्बल २७ खासगी अनुदानित शाळांमधील २६२ शिक्षकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली. यामध्ये शिक्षिकांचाही समावेश असून हे शिक्षक दिलेल्या परिसरातील प्रत्येक घरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्याला सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत का, याची माहिती घेत आहे.
सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या आयएलआय व सारीच्या रुग्णांची माहिती प्रपत्र-अ मध्ये भरुन आरोग्य कर्मचारी किंवा समुदाय आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी यांना सादर करायची आहे. या सर्वेक्षणाच्या कामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून नागरिकांनीही आपल्या परिवारातील सर्व सदस्यांची अचूक माहिती देण्याची गरज आहे.
सर्वेक्षणामुळे शिक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकांनी सर्वेक्षण करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने त्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा पुरवठा करावा, असेही शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे. सर्वेक्षणाच्या कामात महिला शिक्षिकांनाही विविध प्रभागात सर्वेक्षण करीत असताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या रोषालाही बळी पडावे लागत आहे.
व्यक्ती शोधताना होताहेत अडचणी
नगरपालिकेकडून २०११ च्या जनगणनेनुसार शिक्षकांना नाव व परिसराचा नकाशा दिलेला आहे. पण, त्या नकाशावर घर शोधताना मोठी अडचण जात आहे. तसेच काहींचे आडनावच दिल्याने तो व्यक्ती कोणत्या भागात राहातो, याचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना पायपीट करावी लागत असल्याचे काहींकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वेक्षण करताना कोणत्याही अडचणी जाणार नाही व कोणताही व्यक्ती सुटणार नाही. या दृष्टीने अचूक माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिक्षकांच्या नावात असंख्य चुका
शहरातील २७ खासगी अनुदानित शाळांतील २६२ शिक्षकांची सर्वेक्षणासाठी यादी तयार केली आहे. त्या यादीमध्ये शिक्षकांसह शाळांची नावे लिहितांना टायपींगच्या असंख्य चूका दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकाचे नाव आणि आडनाव शोधताना अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने शिक्षकांच्या व शाळेच्या नावाची अचूक यादी तयार करण्याचीही गरज आहे. अन्यथा ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली असून काही शिक्षकांनी शनिवारपासूनच कामाला सुरुवात केली आहे. त्यांना २०११ च्या जनगणनेनुसार परिसराचा नकाशा व रजिस्टरवरील नोंदीनुसार यादीही दिली आहे. यानंतरही शिक्षकांना कुणाचे नाव शोधण्यास अडचण येत असल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा. नागरिकांनीही सर्वेक्षणाकरिता सहकार्य करावे.
- किशोर साखरकर, नियंत्रण अधिकारी, नगर परिषद, वर्धा.