नवी शक्कल, कारच्या सीटमधून गांजा तस्करी; पोलिसांनी हुडकून काढला तब्बल २६५ किलो गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 06:03 PM2022-09-02T18:03:49+5:302022-09-02T18:11:13+5:30
कारमधून नेण्यात येत असलेला २६ लाखांचा २६५ किलो गांजा जप्त, कारंजा तालुक्यात बोरगाव येथील कारवाई
वर्धा : अमली पदार्थाचीतस्करी करणारे कुठली नवीन शक्कल लढवतील याचा काहीच नेम नाही. अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गांजा तस्करांनी चक्क कारच्या सीट आणि डिक्कीत विशिष्ट बॉक्स करून त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपविला. पण 'हम किसीसे कम नही' असेच काहीसे म्हणत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करून अकोल्याच्या दिशेने नेल्या जात असलेला तब्बल २६५ किला गांजा नाकेबंदी करून जप्त केला.
चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा लादून त्याची अकोल्याच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागपूर-अमरावती महामार्गावरील कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव (ढो.) शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली.
एमएच ३१ सीआर ८५२७ च्या वाहनाची बारकाईने तपासणी केली असता कारच्या सीट आणि डिक्कीत तयार करण्यात आलेल्या वेगळ्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कार मधील कय्युम शहा शहन शहा (३४) रा. रहेमतनगर, बोरगाव (मं.) जि. अकोला व शरद बाळू गावंडे (३२) रा. जुनी वस्ती, पठाणपुरा चौक, मुर्तीजापूर, जि. अकोला या दोघांना ताब्यात घेत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व कारमधील २६५ किलो ३२५ ग्रॅम गांजा, मोबाइल असा एकूण ३० लाख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस उपनिरीक्षक गिरडकर, पोलीस अंमलदार प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवी बन्सोड, संजय बोगा, दिनेश बोथकर, अनुप कावळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नितीन मेश्राम, मनीष कांबळे, गणेश खेवले यांनी केली.
गांजा खरेदी विषयी जाणून घेतली जातेय माहिती
गांजा तस्करीचा ठपका ठेऊन अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कय्युम शहा शहन शहा व शरद बाळू गावंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पण या आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून खरेदी केला यासह विविध विषयाची माहिती सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस जाणून घेत आहेत.