४ हजार तूर उत्पादकांचे २६.५० कोटी थकले
By admin | Published: June 19, 2017 01:07 AM2017-06-19T01:07:39+5:302017-06-19T01:07:39+5:30
मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर
हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर उत्पादकांचे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे शासनाकडे अडकले आहेत. त्यांना थकीत चुकाऱ्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तुरीला मिळालेल्या उत्तम दरामुळे गत हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले होते. परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर उत्पादक अडचणीत आला. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव गडगडले. व्यापारी हमी भावापेक्षा हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी करीत होते. यामुळे होणारी लुट टाळण्याची मागणी करीत शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली. यात शासनाने आपण शेतकऱ्यांच्या पाठशी आहो, असे दर्शवित ३ जानेवारी २०१७ पासून २२ एप्रिल पर्यंत नाफेडच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली. यात तालुक्यातील २ हजार ४७८ शेतकऱ्यांकडून नाफेडने ४२ हजार ४७१ क्विंटल तुरीची खरेदी केली; परंतु विविध कारणांनी ही तूर खरेदी रखडल्याने योजना बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून आला. मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने बाजारात तूर असलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिले. या पद्धतीने २३ एप्रिल ते ६ जून पर्यंत खरेदी केली.
या पूर्वी शासनाने नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून येथील ३ हजार ३९८ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ५५९.५८ क्विंटल तूर खरेदी केली. परंतु चुकारे मात्र २० एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचेच देण्यात आले. यामुळे तालुक्यातील जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी ५० लाख रुपयांचे तुरीचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत. शेती हंगाम सुरू झाला आहे. बँका कर्ज देत नाही, सावकारांनी शासन बडग्याची मोठी धास्ती घेतली आहे, अशा स्थितीत तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांकरिता आधार असताना शासन सुद्धा दगा देत आहे. त्यामुळे आता पर्याय काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.