ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी नाचणगावला २.७० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:26 PM2018-02-15T22:26:52+5:302018-02-15T22:28:11+5:30
महाराष्ट्राची भूमी ही किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, कोरीव बांधकाम यांनी संपन्न आहे. ही महाराष्ट्राची ही संपदा कायम राहण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव/पुलगाव : महाराष्ट्राची भूमी ही किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, कोरीव बांधकाम यांनी संपन्न आहे. ही महाराष्ट्राची ही संपदा कायम राहण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला. यात वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथे असलेल्या भोसलेकालीन सराई आणि इसाई माता मंदिराच्या जिर्णोद्धाराकरिता २.७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाचणगाव येथील ऐतिहासिक भोसलेकालीन सराय ही ४०० वर्षांपुर्वींची वास्तू आहे. या ठिकाणी भोसलेकाळात सैनिकासोबत घोडदळाचाही मुक्काम येथे असायचा. काही काळाने या वास्तुचे संवर्धण करणे कठीण झाले होते. ती वास्तू मोडकळीस आली. या पुरातन वास्तुचे जतन व्हावे यासाठी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर व देवळी पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी पर्यटन मंत्री मदन येरावार यांना सदर वास्तुची माहिती दिली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी या पुरातन सरायना विषयक पाठपुरावा केला. तसेच विदर्भातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले नाचणगाव इसामाता मंदिराच्या विकासाचा प्रश्नही मांडला. शेवटी पर्यटन मंत्रालयातर्फे भोसलेकालीन सरईला १ कोटी ८० लाख व इसाई माता मंदिराला १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती बकाने यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला प्रवीण सावरकर, किशोर गव्हाळकर यांची उपस्थिती होती. तसेच प्राथमिक निधीचे वितरणही संबंधित विभागाला केले असल्याचे सांगितले. यामध्ये जुन्या बांधकामाची देखभाल, पथपद, स्टोन पेव्हींग, आकर्षक प्रवेशद्वार, विद्युतीकरण, प्लंबींगण वॉल कंम्पाऊंड याचा समावेश आहे.
यावेळी ओंकार राऊत, राहुल चोपडा, दीपक फुलकरी, जयंत ओक, रमेश निंबाळकर, प्रेम साहू, संतोष तिवारी, सचिन कासार उपस्थित होते. याविषयी बोलताना प्रवीण सावरकर यांनी या कामाला जयंत येरावार तसेच सरपंच सविता गावंडे, उपसरपंच सुरेश देवतळे, पंचायत समिती सदस्य दिलीप अग्रवाल, मंगेश झाडे, प्रेम साहू व सर्व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यटन विभागाचे आभार मानले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथम वेळेस पर्यटनाचा निधी नाचणगावला येण्याचा ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक असलेल्या या इमारतीच्या संवर्धनासाठी गावातील नेत्यांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. आता ती मागणी पूर्णत्त्वास गेली. याकरिता मोठा निधी आल्याने या इमारतीचा कायापालट होणार आहे. तसे त्याचे ब्लू प्रींटही तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी भाजपाच्यावतीने देण्यात आली आहे.