पावसाचा २७४ घरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:47 PM2018-09-25T23:47:36+5:302018-09-25T23:48:29+5:30
दमदार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असताना बारशीचा दिवस असलेल्या शुक्रवार २१ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस बरसला. दुपारी १२ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाचा कमी-अधिक जोर त्या दिवशी जिल्ह्यात कायम होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दमदार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असताना बारशीचा दिवस असलेल्या शुक्रवार २१ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस बरसला. दुपारी १२ नंतर रात्री उशीरापर्यंत पावसाचा कमी-अधिक जोर त्या दिवशी जिल्ह्यात कायम होता. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यातील एकूण २७१ घरांचे अंशत: तर तीन घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
शुक्रवारच्या पावसामुळे लाल नाला प्रकल्प व पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला असला तरी उर्वरित जलाशयांच्या पाणी पातळीत नाममात्रच वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य जलसंकटाचे सावट वर्धा जिल्ह्यावर असल्याचे जल तज्ज्ञ सांगतात. शुक्रवारी झालेला पाऊस चक्रीवादळाचा होता. शिवाय परतीच्या पाऊस लांबला आहे. परतीचा पाऊस वर्धा जिल्ह्यात चांगला बरसेल आणि वर्धेककरांवरील जलसंकट टळेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांसह नागरिकांना आहे. शुक्रवारचा पाऊस सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. शिवाय काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने बºयापैकी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचेही वास्तव आहे. सध्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी शुक्रवारच्या पावसामुळे किती हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान केले याची आकडेवारी प्रत्यक्ष पाहणी करून गोळा करीत आहेत. त्यांच्या सर्वेक्षणाअंती नुकसानीची इत्थंभूत माहिती पुढे येणार आहे.
१७ गोठ्यांचे नुकसान, तीन जनावरे दगावली
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वर्धा व कारंजा तालुका वगळता जिल्ह्यातील विविध भागातील १७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
सततच्या पावसादरम्यान वर्धा व कारंजा तालुका वगळता वीज पडून व गोठा जमिनदोस्त होत त्यात दबून एकूण तीन जानावरांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून एक गाय व एक बैल तर सततच्या पावसामुळे एक छोटे जनावर दगावल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जिल्हा आपत्ती निवारण कक्ष नावालाच?
तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती निवारण कक्ष पूरपरिस्थितीसह झालेले नुकसान आदी ंविषयांच्या आकडेवारी बाबत अपडेट राहत होते. परंतु, सध्यास्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. या विभागाच्यावतीने तालुकास्थळावरून वेळीच माहिती मागविल्या जात नसल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
१,३३१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
शुक्रवारच्या पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील ४६७ हेक्टरवरील विविध शेतपिकांचे ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतपिकांचा आकडा १३३१ हेक्टरच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. तशी नोंद हिंगणघाट तालुका प्रशासनाने घेतली आहे.
बंधारा फुटल्याने कपाशी पिकाचे नुकसान
तळेगाव (टा.) : तळेगावसह परिसरातील एकुर्ली, धोत्रा, आष्टा, सोनेगाव, भोजनखेडा या परिसरातील शेतपिकांना शुक्रवारी झालेल्या पावसाचा बºयापैकी फटका बसल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर सततच्या पावसासह वादळीवाऱ्यामुळे उभी पीक लोळली. तर काही शेताला पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. शुक्रवारचा पाऊस काही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना नवसंजीवनणी देणारा ठरला असला तरी तळेगाव येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांची रात्र बादलीने पाणी घराबाहेर काढण्यात गेली. शिवाय संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तर एकुर्ली येथील शेतकरी शंकर सुरकार यांच्या शेतात सततच्या पावसादरम्यान शेतानजीकचा बंधारा फुटल्याने पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे त्यांच्या शेतातील सुमारे एक एकरातील कपाशी पीक पुर्णत: खरडून गेले. तर दोन एकरातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसासह बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरल्याने मनोहर सुरकार, बंडू गुजरकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा बंधारा लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने तयार करण्यात आला होता.