वर्धेतील २,७९७ जोडप्यांनीच केली विवाह नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:40 PM2018-12-24T22:40:13+5:302018-12-24T22:41:02+5:30
नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.
सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.
विवाह नोंदणी संदर्भात पारदर्शकता यावी यासाठी काही नियमावली लादण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबतचा ठोस निर्णय झाल्यास नवीन नोंदणीसाठी नवविवाहितांना फरफटच करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. आधार कार्ड सारखे सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरकारने सक्तीचे केले नसले तरी विविध कामांसाठी त्याची गरज भासत असल्याचे वास्तव आहे. पासपोर्टसह विविध कामांसाठी सदर प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे असतानाही शहरी भागातील अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी विवाह नोंदणीला फाटाच देत असल्याचे दिसून येते. विवाह नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असली तरी तरुण मंडळींकडून ती किटकच असल्याची बोंब ठोकली जात आहे. नवविवाहित मुलींच्या दृष्टीने सदर नोंदणी महत्त्वाचीच आहे.
नावातील बदलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
लग्नानंतर मुलीचे नाव व आडनाव बदलते. लग्नानंतर मुलीच्या बदललेल्या नावाची विविध कागदपत्रांवर दुरूस्ती करून घेणे यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक व महत्त्वाचेच ठरते. त्यामुळे प्रत्येकाने विवाहानंतर विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे.
विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
विवाह नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबतचे शपथपत्र किंवा निबंधकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वर व वधूचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहनचालविण्याचा परवाना, वयोमर्यादेकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विद्युत किंवा टेलिफोनच्या देयकाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे.
लग्नाची पत्रिका व पत्रिका नसल्यास १०० रुपयांचे शपथपत्र, लग्नाचे छायाचित्र आवश्यक आहे.
वधू व वराचे पाच तसेच साक्षीदारांचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, साक्षीदारांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच वधू किंवा वर घटस्फोटीत असल्यास त्याचा आदेश, वधू किंवा वर विधवा, विधूर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच न.प.मालमत्ता कर भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.