‘धाम’ प्रकल्पातून काढला २,८३५ घनमीटर गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 09:51 PM2019-05-18T21:51:58+5:302019-05-18T21:54:04+5:30
वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले. या प्रकल्पातून कमीत कमी २ लाख घनमिटर गाळ निघेल असा अंदाज असून मागील १७ दिवसात केवळ २ हजार ८३५ घनमिटरच गाळ काढण्यात आला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्याने गाळमुक्त धामच्या कामाला गती देण्याची गरज आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प फायद्याचाच ठरणारा आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय मागील काही वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळत आहे. त्या विषयाला लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वाचाच फोडली. शिवाय धाम गाळमुक्त झाल्यास त्याचे काम फायदे होतील हे लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही दखल घेत महाराष्ट्र दिनी गाळमुक्त धामच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २ हजार ८३५ घनमिटर गाळ सदर प्रकल्पातून काढण्यात आला आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र याच भागातील मासोद परिसरापर्यंत आहे. शिवाय तो भाग सध्या कोरडा झाल्याने याच भागातून सध्या जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात आहे. येत्या काही दिवसात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, त्याच्या पूर्वी २ लाख घनमिटरपेक्षा जास्त गाळ या प्रकल्पातून निघणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती देण्याची मागणी आहे.