अप्पर वर्धा धरणात २९ टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:15 AM2018-11-26T00:15:12+5:302018-11-26T00:15:54+5:30
दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : दुष्काळग्रस्त घोषीत झालेल्या आष्टी तालुक्याला भर हिवाळ्यातच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या नल दमयंती सागर (अप्पर वर्धा) धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. विशेषत: मृत जलसाठा आतापासूनच अधिक खालची पातळी गाठत असल्याने ऐन हिवाळ्यातच दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.
अप्पर वर्धा धरण आष्टी तालुक्याची शान आहे. १९९० पासून या ठिकाणी कधीही पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. मात्र यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धरणामध्ये जलसाठा झाला नाही. दरवर्षी धरणाचे १३ दरवाजे उघडून पाणी सोडल्या जात होते. मात्र यावर्षी धरणाच्या समोरच्या भागातही काहीच पाणी नसल्याने कोरडाठण पाहायला मिळतो. या धरणामधून उर्ध्व वर्धा, डावा कालवा अंतर्गत ३४ कि.मी. पर्यंत पाणी पुरविल्या जाते. शेतकºयांना रब्बी पिकासाठी हे धरण वरदान ठरत होते. पण, आता पाण्याअभावी सिंचनाची गैरसोय निर्माण झाली आहे. यावेळी खरीपासाठी पहिली पाण्याची पाळी सोडली तेव्हा नसल्यासारखेच पाणी शेतात पोहचले आहे.
आष्टी तालुक्यातील २७ गावांना या पाण्याचा लाभ मिळत होता. शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. बेलोरा, खंबीत, अंतोरा, माणीकनगर, देलवाडी, जोलवाडी, अंबीकापूर, लहान आर्वी, लिंगापूर, जैतापूर, किन्हाळा, आष्टी, नविन आष्टी, पेठ अहमदपूर, आनंदवाडी, खडकी, चिंंचोली, वाघोली, सिरसोली, भारसवाडा, चिस्तूर, नरसापूर, सुजातपूर, शिरकुटणी, तळेगाव, खडका, बेलोरा (खुर्द) अशा एकूण २७ गावांना धरणाच्या पाण्यामुळे चांगली व्यवस्था होती. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये वडाळा, वर्धपूर, झाडगाव, सत्तारपूर येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या जमिनीवर काही शेतकरी पीक घेत होते. खरीप वगळता रब्बी पिकाचा जास्त फायदा व्हायचा. पण, यावर्षी येथेही सिंचनाचा काहीसा फटका बसत आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात एप्रील महिन्याची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या संचयीत पाणी साठ्यातील घट लक्षात घेता धरण विभागाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरळीत असलेली पाण्याची साखळी यावर्षी कोलमडली असून सर्वांनाच धक्का देणारी आहे. धरणाच्या परिसरात असलेले पाण्याचे ठिकठिकाणचे लहान डोह सुध्दा संपुष्टात आले आहे. येत्या दिवसात ही स्थिती आणखी भीषण होईल.