३ हजार ७५ शेतकऱ्यांचे अडकले १९.८२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:55 PM2018-03-27T23:55:49+5:302018-03-27T23:55:49+5:30
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्ह्यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांचे तब्बल १९ कोटी ८२ लाख १८ हजार ९५२.५० रुपयांचे चुकारे थकले आहेत. शेतकऱ्यांकडून जुन्या हंगामातील अपयशाच्या आठवणी विसरून नव्या हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. यात चुकारे थकल्याने त्यांची चांगलीच अडचण होत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. या सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करून तूर आणण्याच्या सूचना होत आहेत. नोंद झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल संदेश पाठवून त्यांचा शेतमाल आणण्याबाबत कळविले जाते. या पद्धतीत आतापर्यंत ५ हजार ७६० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहेत. यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ३६ हजार ३७० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
तुरीची खरेदी झाल्यानंतर किमान आठ दिवसांत त्यांना चुकारे मिळणे अपेक्षित आहे; पण जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. नाफेडला तूर देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या संदर्भात मार्केटींग कार्यालयात विचारणा करण्याकरिता शेतकरी जात असून त्यांना अनुदान येताच चुकारे देण्यात येणार असल्यासचे सांगितले जात आहे; पण अनुदान कधी येणार, याची माहिती त्यांना नसल्याचे दिसून येते. शासनाच्या या अनागोंदीमुळे तूर उत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आल्याचे दिसत आहे. शासनाने याकडे लक्ष देत शेतकºयांचे तुरीचे थकित चुकारे त्वरित अदा करणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे
शासनाच्या केंद्रावर तूर देऊन वेळीच रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. शासनाला तूर दिल्यास किमान हमीभाव मिळण्याची आशा आहे; पण रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसते.
येत्या दिवसात चण्याची खरेदी
शासनाकडून तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रांवर तुरीसोबतच चण्याची खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या केंद्रावर चणा खरेदीची तयारी पूर्ण झाली असून त्याचा मुहूर्त लवकरच साधणार असल्याचे मार्केटींग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. चण्याची खरेदीही आॅनलाईन पद्धतीने तुरीच्या निकषानुसार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या शासकीय खरेदीकडे शासनाची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या आॅनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
येत्या चार-पाच दिवसांत चण्याची खरेदी सुरू होणार आहे. शेतकºयांनी केंद्रावर जाऊन आपली आॅनलाईन नोंदणी करण्याची गरज आहे. चणा खरेदीत शेतकऱ्यांकडून शासनाच्या केंद्राला पाठ दाखविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे चुकारे अडले असल्याचे सध्या वास्तव आहे. शेतकऱ्यांना चुकारे देण्याकरिता शासनाकडून लवकरच अनुदान मिळणार असून ते येताच तुरीचे चुकारे देण्यात येणार आहे.
- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.