शहरात नव्याने लागणार ३० सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: July 8, 2016 02:02 AM2016-07-08T02:02:06+5:302016-07-08T02:02:06+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आजच्या घडीला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी डोळे मिटले आहे.
जुने सीसीटीव्ही कॅमेरे बंदच : ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त
वर्धा : सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आजच्या घडीला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी डोळे मिटले आहे. या जागी नवे कॅमेरे लावण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातून शहरात एकूण ३० ठिकाणी नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
रक्कम पडून असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. नव्या कॅमेऱ्यांना अद्यापही निविदेचीच प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर्वी नाका, बजाज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. सदर कॅमेरे तत्कालीन जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रायोजकत्त्वावर लावले होते. या कॅमेऱ्याच्या दुरूस्तीसंदर्भात कुठलेही प्रावधान नसल्याने ते आता बंद पडले आहेत.
शहरातील रस्त्यांवरील हालचाली टिपण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असल्याने पोलीस विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती मागणी मंजूर करण्यात आली होती. यातील ५० लाख रुपये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. यातून नवे कॅमेरे खरेदी करण्यात येणार असून ते शहरातील ३० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यात शहरातील मोठ्या चौकांसह शहराच्या सिमांवरही या कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. शहरात सध्या लागून असलेले कॅमेरे जर सुरू होत असतील तर तेही दुरूस्त करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कॅमेरे खरेदीकरिता निविदा काढण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून कॅमेऱ्यांची खरेदीही लवकरच करून ते ठरलेल्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
जुन्या कॅमेऱ्यांच्या दुरूस्तीची तरतूद नाही
शहरात वाढत असलेल्या मंगळसूत्र चोरीवर आळा घालण्याकरिता मुख्य चौकात प्रायोजकत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. ते कॅमेरे आता बंद पडले आहेत. त्यांच्या दुरूस्तीकरिता शासनाकडे कुठलेही अनुदान नसल्याने आता नवे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. नव्या योजनेनुसार शहरात ३० ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार असून त्या दिशेने पोलीस विभागाचे कार्य सुरू आहे.
मंजूर निधीपैकी ५० लाख रुपये पोलीस विभागाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार कॅमेरे खरेदीकरिता आवश्यक प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कॅमेरे लावण्यात येईल.
- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा.