बोगस ले-आऊटची चौकशी दडपण्यासाठी ३० लाखांची तोडी?

By admin | Published: January 11, 2017 12:53 AM2017-01-11T00:53:33+5:302017-01-11T00:53:33+5:30

सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट

30 lakhs to bogus lay-out inquiry? | बोगस ले-आऊटची चौकशी दडपण्यासाठी ३० लाखांची तोडी?

बोगस ले-आऊटची चौकशी दडपण्यासाठी ३० लाखांची तोडी?

Next

 नऊ जण होते ’आॅऊट आॅफ कव्हरेज’ : नरहरशेट्टीवार प्रकरणाच्या तपासात उघड झाली होती धक्कादायक माहिती
वर्धा : सतीश नरहरशेट्टीवार प्रकरणात सावंगी(मेघे) ठाण्याने केलेल्या चौकशीत एका आरोपीने वर्धा शहरातील ले-आऊट धारकांनी कागदपत्रात केलेल्या हेराफेरीचा पाढाच वाचला होता. यानंतर सावंगी पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. सदर प्रकरण दडपण्यासाठी चक्क ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नरहरशेट्टीवारला अटक केल्यानंतर वर्धेतील ले-आऊट बाबतीतील अनेक घबाड पोलीस चौकशीत बाहेर आणतील, अशी आशा वर्धेकरांना होती. सुरुवातीला सावंगी(मेघे) पोलिसांनी त्याच तोऱ्यात चौकशी केली. चौकशीत गोरखनाथ चौधरी याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वर्धेतील ले-आऊटमधे कसे घबाड झालेले आहे याची इत्यंभूत माहिती पोलिसांपुढे उघड केल्याचेही पोलीस सूत्राने म्हणणे आहे. या अनुषंगाने ज्यांची नावे बयाणात पुढे आली त्यांना चौकशीसाठी बोलाविणे एखाद्या प्रकरणात क्रमप्राप्त ठरते. मात्र एकालाही चौकशीसाठी बोलाविल्याचे ऐकिवात नाही. ही बाब संबंधित ले-आऊट धारकांना माहिती होताच कारवाईच्या भीतीने सुमारे नऊजण वर्धेतून एकाएकी भूमिगत झाले. तब्बल आठ दिवस ही मंडळी ‘आॅऊट आॅफ कव्हरेज एरिया’ होती. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रकरण दडपण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. यामध्ये त्यांना यश आले. सदर प्रकरणाची चौकशी दडपण्यासाठी तब्बल ३० लाखांची तोडी झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यानंतर आरोपीने याबाबत दिलेल्या बयाणात गडबड झाल्याचेही सूत्राने सांगितले. सदर प्रकरण निवळल्यानंतर सर्वजण वर्धेत दाखल झाले. आता ते निर्धास्त असल्याचेही सांगण्यात आले. नरहरशेट्टीवार प्रकरणात अनेक खळबळजनक बाबींचा उलगडा झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण गांभिर्याने हाताळणे बंद केल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे. नरहरशेट्टीवार प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक वास्तव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

पोलीस अधीक्षकांची भूमिका अद्यापही मवाळ
नरहरशेट्टीवार प्रकरण हे वर्धा पोलिसांसाठी अभिमानाची बाब ठरणारी होती. याप्रकरणात अनेक धक्कादायक वास्तव पुढे येणार हे वर्धेकर गृहीत धरुन होते. मात्र प्रकरणात पोलीस अधीक्षकांचीच भूमिका मवाळच दिसली. सावंगी ठाणेदाराने जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेली आहे. यानंतर एका दुचाकीस्वाराला नशेत असल्याचे सांगून बेदम मारहाण केली यात त्याचा हात मोडला. याचीही तक्रार पोलीस अधीक्षकांकडे गेलेली आहे. इतकेच नव्हे, तर सदर दुचाकीस्वाराच्या मित्राला सावंगी ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून नशेत असल्यामुळे दुचाकीला अपघात झाल्याचे बयाण नोंदवून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात पोलीस अधीक्षक इतके मवाळ कसे काय, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तपासच संशयास्पद
वर्धा शहरात विक्री अलीकडच्या काळातील असताना एनए मात्र त्याहीपेक्षा जुना आहे. ही बाब यापूर्वीच वर्धेत परिविक्षाधिन अधिकारी असताना शिवशंकर यांनी उघडकीस आणली होती. नरहरशेट्टीवार यांच्या प्रकरणाच्या निमित्ताने सदर बाब चौकशीत येणे अनिवार्य असताना याबाबत पोलीस खोलात जावून चौकशी का करीत नाही, असा सवाल संशयाला बळ देणारा असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: 30 lakhs to bogus lay-out inquiry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.