गोठ्याला लागलेल्या आगीत ३० क्विंटल कापूस स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:47 PM2018-03-14T22:47:00+5:302018-03-14T22:47:00+5:30
तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. यात त्यांचे अंदाचे दोन लाख रुपयांवर नुकसान झाले. नागरिकांच्या सतर्कतेने परिसरात आग पसरली नाही.
तास येथील साहेबराव धोटे यांच्याकडे १२ एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले होते. जवळपास ३० क्विंटल निघालेला कापूस त्यांनी गोठ्यात साठवून ठेवला होता. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच प्रफुल उसरे, मनीष नांदे, अनिल सूर्यवंशी, आशीष सूर्यवंशी, नानाजी धोटे, पुंडलिक धोटे, चिंतामण सूर्यवंशी, मधुकर उसरे, पंढरी वैद्य, कवडू कोल्हे, शंकर सुपारे आदी नागरिकांनी गावातील विहिरीवरून मोटार पंप सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत गोठ्यातील ३० क्विंटल कापूस स्वाहा झाला होता. गोठ्यातील शेतीपयोगी साहित्यही जळून खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग परिसरात पसरली नाही.
माहिती मिळताच तलाठी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. धोटे कुटुंबीयांचे उदरनिवार्हाचे साधन शेतीच आहे. कष्टाने पिकविलेले कपाशीचे पीक हातचे निघून गेल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयाला शासकीय मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.