३०० किमीचे पांदण रस्ते सुधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:39 PM2018-01-05T23:39:59+5:302018-01-05T23:40:12+5:30
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पांदण रस्ते गत वर्षी मोकळे केले आहेत. २०१७ मध्ये २५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा घेत मागेल त्याला पांदण रस्ता असा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन ५० किमी पर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत केले आहेत. सध्या स्थितीत ११७ अर्ज प्रलंबित असून २०१८ मध्ये ३०० किमीपर्यंतचे पांदण रस्ते सुस्थितीत करण्याचा आमचा मानस जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नवाल पुढे म्हणाले, २०१७ मध्ये रूरल मॉल, जलयुक्त शिवार आदी विविध उल्लेखनिय कार्य जिल्ह्यात झाली आहेत. सध्या रूरल मॉलमधून नफा मिळत नसला तरी त्यात काय सुधारणा हवी याचा विचार आम्ही करणार आहोत. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजाणी नवीन वर्षात होणार आहे. अंगठा लावा गावातच पैसे मिळवा असा उद्देश ठेऊन आधारचा वापर करून गावातच वयोवृद्ध व पेंशनर आणि नागरिकांना त्यांच्या बँक खात्यातील दोन हजारांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे.
शेतकरी निर्मिती कंपनी, प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष कार्य केले जाणार आहे. शिवाय शेळीपाल, दुग्ध व्यवसाय, मत्स्य, रेशीम शेती आदी शेतीपुरक व्यवसायाला चालणा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील माता व बालमृत्यू दर सध्या १२ असून तो शुन्य कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जलयुक्त शिवाराची जिल्ह्याची दोन मॉडेल राज्य शासनाने ग्राह्य धरली आहेत. या दोन्ही मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन तशा पद्धतीची कामे राज्यभरात होणार आहेत.
सरत्या वर्षांत शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार २० शेतकऱ्यांना तसे साहित्य पुरविण्यात आले होते. यंदा यात वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, या प्रकारातून नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यासंदर्भातही ते म्हणाले.
सध्या वर्धा शहरात ग्रीन जीम उभा झाला आहे. तसाच ग्रीन जीम जिल्ह्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये व्हावा, या दिशेने सन २०१८ मध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचेही यावेळी शैलेश नवाल यांनी सांगितले. य पत्रकार परिषदे दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विविध विकास कामांच्या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले.