१२ तासात ३०५.८२ मि.मी. पाऊस
By admin | Published: July 4, 2016 01:39 AM2016-07-04T01:39:53+5:302016-07-04T01:39:53+5:30
दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.
जिल्ह्यात आतापर्यंत १८१५.९३ मि.मी. पावसाची नोंद
वर्धा : दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस जिल्ह्यातील वर्धा तालुक्यासह आर्वी, सेलू, देवळी, आष्टी (शहीद), हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तालुक्यात सर्वत्र आला. हा पाऊस रविवारी सकाळीही सुरूच होता. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ३०५.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८१५. ९३ मि.मी. पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्या आटोपल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी सायंकाळी ५ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात १८.२० मिमी. पावसाची नोंद झाली. हिंगणघाट तालुक्यात ५६.२ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात ४४ मिमी पाऊस पडला. देवळी तालुक्यात ३४.०२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जंगलव्याप्त परिसर अशी ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात ६९ मिमी. आष्टी तालुक्यात २३.६ मि.मी. व कारंजा (घाडगे) तालुक्यात ४०.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यात २०.२ मिमी इतकी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात या १२ तासात ३०५.८२ मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी ३८.२२ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २२६.९९ इतका सरासरी पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)