सामूहिक सोहळ्यात ३१ जोडपी विवाहबद्ध
By admin | Published: May 9, 2017 01:06 AM2017-05-09T01:06:18+5:302017-05-09T01:06:18+5:30
गरजू, सामान्य कुटुंबाचा लग्नसमारंभावरील खर्च टाळण्यासाठी सेवा समितीद्वारे संचालित ...
नवदांपत्यांना आवश्यक वस्तूंची भेट : सेवा समितीचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरजू, सामान्य कुटुंबाचा लग्नसमारंभावरील खर्च टाळण्यासाठी सेवा समितीद्वारे संचालित वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन, साउंड सिस्टीम, कॅटरर्स असोसिएशनच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध जाती-धर्माची ३१ जोडपी विवाहबद्ध झाली.
या सोहळ्याकरिता भव्य शामियाना उभारला होता. सर्वत्र रोषणाई, कार्यकर्त्यांप्रमाणे झटणारे व्यावसायिक, हजारो नागरिकांचा सहभाग, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, असे या सोहळ्याचे स्वरुप होते. शहरातील मंडप डेकोरेशन, इलेक्ट्रिक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स व्यावसायिकांनी सामाजिक भान जोपासत या आयोजनातून समाजासमोर एक उत्तम उदाहरण घालून दिले. सुमारे सहा हजार महिला, पुरुष, युवकांनी या सोहळ्यात सहभागी होत ३१ नवदांपत्यांच्या आनंदात भर घातली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परसवाडा येथील गुरुदेवधाम मानवसेवा कल्याण आश्रमचे नाना महाराज कांबळे होते. यासह खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, पालिकेचे बांधकाम सभापती निलेश किटे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुस्लीम समाजाचे अताउल्लाखान पठाण, आयोजक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत राठी, सचिव सुनील भोवरे, सहसचिव संजय ठाकरे, प्रवीण होणाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शास्त्री चौकस्थित धर्मशाळेत वर-वधु आणि आप्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून थाटामाटात वरात काढण्यात आली. बॅण्ड पथकांच्या निनादात व आतीषबाजीत ही मिरवणूक बजाज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर्वी नाका चौक आणि येथून आयोजनस्थळी दाखल झाली. ही वरात पाहण्याकरिता वर्धेकरांमध्ये उत्सुकता दिसून आली.
मुस्लीम समाजाच्या जोडप्याचा मौलाना हफीज मुस्ताक अहमद यांनी निकाह पढला. यानंतर बौद्धधर्मीय ११ जोडप्यांचे लग्न भन्ते राजरत्न यांनी धम्मानुसार विधिवत लावून दिले. हिंदूधर्मीय १९ जोडप्यांचा विवाहविधी वैदिक मंत्रोच्चाराने प्रदीप विंजे महाराज यांनी पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भोवरे यांनी केले. संचालन संजय ठाकरे यांनी तर आभार प्रशांत कोल्हे यांनी मानले. संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी वैयक्तिक पातळीवर वधुला साडी, पोथ, वराला शर्ट-पँट, किचन रॅक, चौरंग पाट, टेबल फॅन, घड्याळ आदी साहित्य भेटस्वरुपात दिले. याला पराग राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक कठाणे यांनी सोन्याचे मंगळसूत्र भेटवस्वरुपात देऊन सहकार्य केले. यासोबतच या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या या सर्व जोडप्यांना शासनाच्या वतीने १० हजार रुपयांचा धनादेश, सहा हजार रुपयांचे दागिने आणि चा हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे.
स्त्री-पुरुषांकरिता स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यात हजारो लोकांची उपस्थिती असताना शिस्तबद्धता दिसून आली. आयोजनाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.