सेवाग्रामच्या विकासासाठी ३१ कोटींची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:32 PM2018-09-06T22:32:38+5:302018-09-06T22:33:48+5:30
महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सुचविल्याप्रमाणे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पायाभूत सुविधा विकास व सौदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
सेवागाम गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २३ कोटी रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आली आहे. सेवाग्राम सोबतच भुगाव, बरबडी, चितोडा, इंझापूर, सेलूकाटे या गावांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सेवाग्राम गावात ६० लक्ष ४४ हजार रुपयांची पूर सरंक्षणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महात्मा फुले जलभूमी अभियानाअंतर्गत अण्णा सागर तलाव पूनर्भरण व जलसंधारणाची ५ कोटी ५० लाख रुपयांचे काम सुरू आहे. यात ७५ लक्ष ४१ हजार रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. सेवाग्राम मधील मुळ गावठाणाचा विकास करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने सुचविलल्याप्रमाणे आराखड्याअंतर्गत कस्तुरबा चौक ते आश्रमपर्यंत नाली बांधकाम, फुटपाथ, सायकल ट्रॅक, विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याशिवाय सुद्धा सेवाग्राममध्ये विकास कामे सुरू आहेत. नागरिकांच्या मागणीप्रमाणे गावातील इतर विकास कामे सुद्धा वर्षभरात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.