३१ हजार रुग्णांना मिळाला जीवनदायीचा लाभ
By admin | Published: July 17, 2017 02:02 AM2017-07-17T02:02:10+5:302017-07-17T02:02:10+5:30
गोरगरीब रुग्णांवरील शस्त्रक्रियांकरिता शासनाकडून राजीव गांधी जीवनदायी योजना राबविली जात आहे.
चार रुग्णालयांचा समावेश : ७१ कोटी ८६ लाखांची रक्कम प्राप्त
प्रशांत हेलोंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोरगरीब रुग्णांवरील शस्त्रक्रियांकरिता शासनाकडून राजीव गांधी जीवनदायी योजना राबविली जात आहे. या योजनेचा गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील चार रुग्णालये या योजनेचा लाभ देण्यास पात्र ठरविण्यात आली आहेत. या चार रुग्णालयांमध्ये नोव्हेंबर २०१३ ते जुलै २०१७ पर्यंत तब्बल ३१ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. या पोटी शासनामार्फत चारही रुग्णालयांना ७१ कोटी ८६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये रुग्णालयांत भरती रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून मदत केली जाते. यासाठी जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), कस्तूरबा रुग्णालय सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा आणि रिपल राणे हॉस्पीटल आर्वी यांचा समावेश आहे. या चार रुग्णालयांद्वारे गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. सावंगी रुग्णालयामध्ये आजपर्यंत १८ हजार ९९१ रुग्णांवर या योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या पोटी रुग्णालयाला शासनाकडून ५६ कोटी २७ लाख ८४ हजार ५५६ रुपये प्राप्त झाले आहेत. सेवाग्राम रुग्णालयाद्वारे १० हजार ८०६ रुग्णांवर या योजनेत उपचार करण्यात आलेत. या मोबदल्यात रुग्णालयाला शासनाने १४ कोटी ५६ लाख १० हजार २९४ रुपये अदा केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातही ७३८ रुग्णांवर या योजनेतून औषधोपचार करण्यात आले. या पोटी सामान्य रुग्णालयाला ६४ लाख १० हजार ७५० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शिवाय रिपल राणे हॉस्पीटल आर्वीने ३४८ रुग्णांवर जीवनदायी योजनेंतर्गत उपचार केलेत. या मोबदल्यात शासनाकडून रुग्णालयाला ३७ लाख ७५ हजार ३५० रुपये अदा केले आहेत. जिल्ह्यातील चारही रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गोरगरीब, गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. परिणामी, सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये विविध प्रकारच्या आजारांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेकरिता दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या अनुदानात बसणाऱ्या शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून केल्या जातात. सध्या सर्वाधिक शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इतर रुग्णालयात मात्र लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.
मुत्रपिंडाचे सर्वाधिक रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल ते जुलै या कालावधीत मुत्रपिंडाच्या आजाराबाबतचे सर्वाधिक रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात आला. मुत्रपिंडाबाबतच्या ३८ रुग्णांपैकी २६ रुग्णांना जीवनदायीचा लाभ मिळाला आहे. यापोटी रुग्णालयाला १ लाख ७५ हजार ८७५ रुपये अदा करण्यात आले आहे. कान, नाक, घशाच्या आजारातील २९ पैकी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असून १ लाख १ हजार ५०० रुपये, जळालेल्या ५ प्रकरणांत १ लाख ७१ हजार ५०० रुपये, सामान्य शस्त्रक्रियेत एका रुग्णापोटी १४ हजार, प्रसूतिमधील तीन रुग्णांपोटी ३१ हजार ५०० रुपये, मूळव्याधीच्या ४ रुग्णांपोटी ७० हजार रुपये, अपघातग्रस्त तथा अन्य आजारांतील ९ रुग्णांपोटी ८७ हजार ५०० रुपये असे एकूण ७७ रुग्णांपोटी ६ लाख ५१ हजार ८७५ रुपये प्राप्त झालेत.