१.६४ लाख शेतकऱ्यांना ३१.६७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:47 PM2018-06-13T21:47:44+5:302018-06-13T21:47:44+5:30

मागील खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात आली होती.

31.67 crores to 1.64 lac farmers | १.६४ लाख शेतकऱ्यांना ३१.६७ कोटी

१.६४ लाख शेतकऱ्यांना ३१.६७ कोटी

Next
ठळक मुद्देबोंडअळीच्या नुकसानाची मदत खात्यात जमा : आठही तालुक्यांमध्ये पहिल्या हप्त्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात आली होती. आता तिचे वाटप सुरू करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्या हप्त्यातील मदत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. यात १२ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ३१ कोटी ६७ लाख रुपये वळते करण्यात आले आहेत.
मागील खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्याला १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. या रकमेतून २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात एकूण २ लाख १३ हजार १२२ शेतकऱ्यांनी २ लाख ५४ हजार ५२६.३८ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती. गुलाबी बोंडअळीचा जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. यामुळे शासनाच्या सूचनेनुसार कृषी विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती व बागायती, असे वर्गीकरण करून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ हेक्टरवरील पीक मदतीसाठी पात्र ठरले आहे. यात २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पहिला हप्ता म्हणून ४१ कोटी ०१ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडून ‘रिलीज’ करण्यात आले आहेत. यातून पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. १२ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४६३ म्हणजे ७७.२३ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१ कोटी ६७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम एक-दोन दिवसांत जमा करण्यात येणार आहे.
पहिल्या हप्त्यातील सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित मदतही दिली जाणार आहे. एकूण तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नुकसान भरपाईची मदत प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्धा तालुक्यात ३ कोटी १२ लाख (४७.६३ टक्के), सेलू तालुक्यात ३ कोटी ३५ लाख (५६.२८ टक्के), आर्वी ३ कोटी ८६ लाख (९८.९७ टक्के), आष्टी १ कोटी ७२ लाख रुपये (६०.७८ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. शिवाय देवळी तालुक्यात ४ कोटी ८७ लाख, हिंगणघाट ७ कोटी ७३ लाख, समुद्रपूर ६ कोटी ३७ लाख आणि कारंजा तालुक्यात २ कोटी ८१ लाख ही १०० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. एकूण ७७.२३ टक्के शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम वळती झाली असून २२.७७ टक्के शेतकऱ्यांना एक-दोन दिवसांत मदत मिळणार आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार
शासनाकडून जाहीर झालेल्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात आधार झाला आहे. पहिल्या हप्त्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित रक्कमही दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यात खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
चार तालुक्यांत १०० टक्के वाटप
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेचे वाटप करावयाचे होते. यासाठी पहिल्या हप्त्यात ४१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. या रकमेचे चार तालुक्यांमध्ये १०० टक्के वाटप करण्यात आले आहे. यात देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर आणि कारंजा तालुक्याचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही रक्कम शिल्लक असून शेतकºयांचे खाते क्रमांक क्लियर होताच ती वितरित केली जाणार आहे.
दोन हप्त्यात ११२ कोटींचे वितरण
पहिल्या हप्त्यामध्ये शासनाकडून ४१ कोटी ०१ लाख रुपयांचे वाटप केले जात आहे. उर्वरित ११२ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. आता ही रक्कम वितरित करण्याकरिता शासनाकडून किती दिवस लागतात, हे मात्र पाहावे लागणार आहे.

Web Title: 31.67 crores to 1.64 lac farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस