तीन महिन्यांत ३२ लाखांचा दंड शासनाच्या तिजोरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:02+5:30
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोशल डिस्टन्सिंग, हॅण्ड वॉशचा आणि मास्कचा वापर या त्रिसुत्रीवर भर दिल्या जात असून नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही उपविभागात ५६२ गुन्हे दाखल करुन ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात वर्धा राज्यात अव्वल असताना दंडात्मक कारवाईच्या बाबतीतही विदर्भात वर्धा प्रथमस्थानीच आहे.
कोरोना पाय पसरण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करीत जिल्ह्यामध्ये २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदी लागू करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे तसेच कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून अवैधरीत्या प्रवास करणे, शिथिलेच्या काळात वेळेपूर्वी आणि वेळेनंतरही प्रतिष्ठाने सुरु ठेवणे आदींबाबत धडक मोहीम राबवून पथकांमार्फत कारवाई केली जात आहे.
नियमांचे पालन होते की नाही, यावर वॉच ठेवण्यासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागामध्ये ३६ पथके तयार केली. या पथकांनी ३०३ गावांमध्ये भेटी देऊन ५६२ विरुद्ध गुन्हे दाखल करीत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल केला. अजूनही पोलीस प्रशासन, महसूल विभाग व नगरपालिका यांच्या माध्यमातून कारवाईची प्रक्रीया सुरुच आहे. त्यामुळे हा दंडाचा आकडाही वाढतच जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधिक उपायोजना केल्या जात आहे. त्यानुसारच २३ मार्चपासून तिन्ही उपविभागामध्ये ३६ पथकाव्दारे कारवाईला सुरुवात करण्यात आली असून अद्यापही कायम आहे. आतापर्यंत ३८ लाख १ हजार २६९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल करणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.
- नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी, वर्धा