३२१ किमीचे राज्य मार्ग, ७२६ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:02+5:30
दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांतील तब्बल ३२१ किमीचे राज्य मार्ग तसेच ७२३ किमीचे प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले आहे. याच मार्गांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली असली, तरी उसंत घेत सुरू असलेला पाऊस खड्डे बुजविण्याच्या कामात व्यत्यय आणत असल्याचे वास्तव आहे.
दर्जोन्नत झालेले हिंगणघाट तालुक्यातील १६८ किमीचे सहा प्रमुख जिल्हा मार्ग नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, तर देवळी तालुक्यातील २० किमीचा एक प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जि. प.च्या बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. सध्य:स्थितीत देवळी तालुक्यातील ४२ टक्के राज्य मार्ग, तर ६३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्डे, हिंगणघाट तालुक्यातील ६८ टक्के राज्य मार्ग, तर ५३ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे, समुद्रपूर तालुक्यातील ६९ टक्के राज्य मार्ग, तर ४८ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे सेलू तालुक्यातील ५२ टक्के राज्य मार्ग, तर ५२ टक्के प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे तसेच वर्धा तालुक्यातील राज्य मार्गावरील ६९ टक्के, तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ७२ टक्के खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले आहे. पण, पावसामुळे पुन्हा नवीन खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याची टक्केवारी कमी होत आहे.
पावसाने विश्रांती घेताच दिली जाणार गती
- जिल्ह्यातील राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग गुळगुळीत व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे; पण सध्या उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडचणीत भर टाकली आहे. असे असले तरी पावसाने विश्रांती घेताच जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- जिल्हा परिषद प्रशासनाकडून तब्बल सात दर्जोन्नत दस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते झाल्याने यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाट्याला खड्डेमय रस्ते जास्त आले आहेत. पण तेही लवकर गुळगुळीत करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे.