३,२७० नमुन्यांची झाली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:57 PM2019-01-18T23:57:13+5:302019-01-18T23:59:24+5:30
जिल्ह्यातील विविध भागात सध्या विकास कामे झटपट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. ही विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी अशा मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून होत असलेल्या बांधकामादरम्यान विविध प्रकारचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्धा येथील क्षेत्रिय गुणनियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील विविध भागात सध्या विकास कामे झटपट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. ही विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी अशा मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून होत असलेल्या बांधकामादरम्यान विविध प्रकारचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्धा येथील क्षेत्रिय गुणनियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. मागील ११ महिन्यात तब्बल ३ हजार २७० नमुन्यांचे परिक्षण या प्रयोगशाळेत करून त्याबाबतचा चाचणी अहवाल निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळा सा.बां.वि. उपविभाग क्र. १ वर्धा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत कार्यरत उपविभागामार्फत आॅनलाईन सादर करण्यात आलेल्या पत्राद्वारे आवश्यक चाचणी साहित्य प्रयोगशाळेत प्राप्त होतात. यात गिट्टी, मुरुम, विटा, रेती, सिमेंट तसेच डांबर आणि कॉक्रीट क्युब आदी नमुन्याचे परिक्षण करून चाचणी अहवाल सादर करण्यात येतात. जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रयोगशाळेत एकूण ३ हजार २७० नमुने सादर केले. त्याचे परिक्षण करून चाचणी अहवाल निर्गमित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात मानकाप्रमाणे आवश्यक साहित्य आढळून आले आहे.
४९.२ लाखांची केली कमाई
सदर साहित्य चाचणी करण्यासाठी संबंधितांकडून शासकीय नियमाप्रमाणे आॅनलाईन शुल्क आकारण्यात येते. जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सा.बां.वि.च्या जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेला ४९ लाख २ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
अल्प मनुष्यबळावर ओढला जातोय गाडा
सध्या सा.बां.वि.च्या जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच काही कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी महत्त्वाचे असलेले लॅब असीस्टंट व इतर काही पद रिक्त आहेत. अल्प मनुष्यबळाच्या जोरावर सध्या या प्रयोगशाळेतील कामकाजाचा गाढा ओढला जात असल्याचे वास्तव आहे. तेथील कामकाम सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता संजय मिसाळ व कनिष्ठ अभियंता किशोर काळबांडे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.
मानकाप्रमाणे आढळले साहित्य
जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संबंधित विभागांकडून जिल्हा क्षेत्रिय गुणनियंत्रक प्रयोगशाळेला एकूण ३ हजार २७० नमुने प्राप्त झाले. त्याची तपासणीही करण्यात आली असून त्यात मानकाप्रमाणे साहित्य आढळून आल्याचे सांगण्यात आले.