३३ जोडपी अडकली विवाह बंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:33 PM2018-04-19T22:33:36+5:302018-04-19T22:33:36+5:30
स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावनेरचे आ. सुनील केदार तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस, आ. अमर काळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे, विधान परिषद सदस्य आ. ख्वाजा बेग, अशोक महाराज पालीवाल, नगराध्यक्ष मिरा येनुरकर, उपाध्यक्ष हमीद खाँ, माजी पं.स. सभापती प्रा. अरूण बाजारे, ईश्वर वरकड, मोहन बेले, जि.प. सदस्य त्रिलोकचंद कोहळे, मुकेश कराळे, कलावती वाकोडकर, मेघराज चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते स्व.आ. डॉ. शरदराव काळे, स्व. मातोश्री अनुराधा काळे, स्व. बाबुजीदादा मोहोड यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. गत १८ वर्षांपासून दहा हजार लोकांचे नि:शुल्क भोजन तयार करणारे आचारी चैतराम भोंडवे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना चारूलता टोकस म्हणाल्या की, भारतात सर्वाधिक पैसा विवाह सोहळ्यासारख्या प्रथेवर खर्च होतो. आर्थिक व सामाजिक विषमता संपविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजात पुरूष व महिला यांना समान हक्क देणे गरजेचे आहे. समाजात बलात्कारासारखा दुर्दैवी व निंदनीय घटना घडत आहेत. त्यासाठी चांगले विचार व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आ. सुनील केदार यांनी युवकांना रोजगार नसल्याने प्रचंड बरोजगारी वाढल्याचे सांगून सामुहिक विवाह सोहळा आदर्श व स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अशोक महाराज पालीवाल यांनी मुलींचा जन्मदर कमी झाल्याने मुलांना मुली मिळत नाहीत. त्यासाठी मुलीकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहून स्त्री-भ्रूणहत्या थांबवावी. दोन जीव, दोन गाव, दोन कुटुंब याचे मिलन म्हणजे सामूहिक विवाह सोहळा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
प्रारंभी बौद्ध धर्माच्या रितीप्रमाणे सात जोडप्यांचे लग्न पौराहित्य विनायक मतले यांनी लावून दिले. २६ हिंदू जोडप्यांचे लग्न यावेळी लावून देण्यात आले. सर्व ३३ वर-वधूंना वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कपडे व वृक्षलागवडीसाठी बियाणे भेट दिले.
प्रतिष्ठानच्यावतीने आ. अमर काळे, पत्नी मयुरा काळे यांनी कपडे, भांडी, मंगळसुत्र दिले. वर-वधूंना ताटपाटाचे जेवण देण्यात आले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरूण बाजारे यांनी केले. प्रास्ताविक आ. अमर काळे यांनी केले तर आभार अविनाश गोहाड यांनी मानले. कार्यक्रमाला गावकरी, कार्यकर्ते, महिला-पुरूष, युवक मंडळी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छोटू शर्मा, प्रकाश मसराम, शक्ती गोरे, श्रीकांत गुल्हाने, नरेश राईकवार, संजय सिरभाते, डॉ. प्रदीप राणे, युवराज राऊत, सौदानसिंग टॉक, दिलीप राही, प्रमोद चोहटकर, गजानन गावंडे, जगदीश काळे आदींनी सहकार्य केले.
वनविभागाच्या उपक्रमाची प्रशंसा
शासकीय कामासोबतच सामाजिक सलोखा जोपासणारे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी ३३ ही जोडप्यांना वाटप केलेले कपडे व बियाणे याची आ. अमर काळे यांनी प्रशंसा केली. सर्व अधिकाºयांनी मनावर घेतले तर सामाजिक उपक्रम यशस्वी करू शकतात हे यामधून चौधरी यांनी दाखवून दिल्याचे अॅड. चारूलता टोकस म्हणाल्या. शासनाला याबाबतची माहिती पाठवून आदर्श अधिकारी पुरस्कारसाठी शिफारस करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
ख्वाजा बेग यांनी दिला निधी
विधानपरिषद सदस्य आ. ख्वाजा बेग यांनी कब्रस्थान कमिटीला दहा लक्ष रूपयाचा निधी दिला होता. यामधून काम पूर्ण करण्यात आले. त्याबद्दल काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे प्रा. सय्यद अफसर अली, शोयब खान, अब्दुल्ला शहा यांनी त्यांचा मुस्लीम बांधवांच्यावतीने सत्कार केला.