भोसा गावात मिळतात ३३ प्रकारचे दाखले घरबसल्या! ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल

By महेश सायखेडे | Published: April 8, 2023 04:25 PM2023-04-08T16:25:22+5:302023-04-08T16:25:31+5:30

या प्रणालीमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जमा-खर्च, ग्रामपंचायत भत्ता, दायित्वे, कर आकारणी नोंदवही व इतरही सार्वजनिक कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. 

33 types of certificates are available in Bhosa village sitting at home! Top from Nagpur division in e-gram system | भोसा गावात मिळतात ३३ प्रकारचे दाखले घरबसल्या! ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल

भोसा गावात मिळतात ३३ प्रकारचे दाखले घरबसल्या! ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल

googlenewsNext

वर्धा : नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, कागदपत्र घरबसल्या मिळावेत यासाठी शासनाने ई-ग्राम प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली राबविण्यात समुद्रपूर तालुक्यातील भोसा ही ग्रामपंचायत नागपूर विभागातून प्रथम ठरली आहे. या प्रणालीद्वारे ३३ प्रकारचे दाखले ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. यामुळे वेळ व पैशाची बचत होणार आहे.

भोसा ग्रामपंचायतीच्या सरपंच पिंकी अंड्रसकर, ग्रामसेवक सचिन डेहनकर व डाटा एन्ट्री ऑपरेटर संदीप करीले यांच्या पुढाकारातून ही प्रणाली या ग्रामपंचायतीत सर्वप्रथम सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जमा-खर्च, ग्रामपंचायत भत्ता, दायित्वे, कर आकारणी नोंदवही व इतरही सार्वजनिक कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. ग्रामस्थांना १ ते ३३ नमुन्यातील दाखले महा ई-ग्राम ॲपच्या माध्यमातून मोबाईलवरूनही मिळविता येणार आहे.

राज्य सरकारच्या तांत्रिक चमूने दिली भेट
संबंधित प्रणाली कशाप्रकारे राबविली जात आहे याची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारच्या तांत्रिक चमूने भोसा ग्रामपंचायतीला भेट देऊन आढावा घेतला. शिवाय ग्रामपंचायत ई-ग्राम प्रणाली योग्य प्रकारे राबवित असल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत मिळेल दाखले
मालमत्ता उताऱ्यासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये जावे लागते. या नावीन्यपूर्ण प्रणालीमुळे आता नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या १ ते ३३ सेवा, विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळतील. ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांना माहिती मिळण्यास विलंब होत होता, पण आता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थिती कालावधीत ग्रामस्थांना वेळीच दाखले उपलब्ध होणार आहेत.

महा ई-ग्राम प्रणाली इतरही सर्व ग्रामपंचायतीत लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. ई-ग्राम प्रणाली भोसा ग्रामपंचायतमध्ये राबविण्यासाठी दाखविलेला उत्साह व घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भोसा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळेच भोसा ग्रामपंचायत ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल ठरली आहे.
- रोहन घुगे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.

Web Title: 33 types of certificates are available in Bhosa village sitting at home! Top from Nagpur division in e-gram system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.