बँकांचे ३४२ कोटीचे कर्ज वितरण
By admin | Published: June 25, 2016 01:58 AM2016-06-25T01:58:14+5:302016-06-25T01:58:14+5:30
जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचे देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
बँक आॅफ बडोदाला नोटीस : पीककर्ज देण्याच्या सूचना
वर्धा : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचे देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. ६३० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ३४२ कोटी ७७ लक्ष रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी अधिक गतीशील प्रक्रिया राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आढावा बैठकीत दिल्या.
शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी तलाठ्यांनी तात्काळ सातबारा आणि आठ अ उतारा उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रासहीत पीक कर्जासाठी अर्ज सादर करणे सोईचे होईल. शेतकऱ्यांनी सुद्धा पीक कर्जासाठी तात्काळ संबंधित बँकेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. शेतकऱ्यांना एक लाखाच्यावर पीक कर्ज घेण्यासाठी गहाणाची प्रक्रिया करावी लागेल; मात्र अडीच लाखापर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क लागणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
बँक आॅफ बडोदाचे कर्ज वितरण असमाधानकारक असल्यामुळे जिल्हाधिकऱ्यांमार्फत नोटीस बजावण्यात आली. तसेच कार्पोरशेन बँक, देना बँक, इंडियन ओव्हरसिस आणि युको बँक यांनी कर्ज वितरण अधिक गतीशील करावे. प्रसंगी शाखास्तरावर विशेष शिबिर आयोजित करून १०० टक्के उद्दिष्ट साध्य होईल या दिशेने कार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी देण्यात आलेल्या शासकीय सवलतीच्या योजनाची माहिती देणारे फलक प्रत्येक बँक शाखेत बँक व्यवस्थापकांनी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)