दारूसाठ्यासह ३.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:56 AM2017-08-14T00:56:55+5:302017-08-14T00:57:38+5:30
पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोळा, गणेशोत्सव आदी सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने पुलगाव पोलिसांनी रविवारी सकाळी नजीकच्या वायफड पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गावठीदारूसह ३.४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वायफड पारधी बेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळून ती परिसरातील गावांमध्ये विकल्या जात असल्याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वायफड पारधी बेड्यावर रविवारी सकाळी छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी गावठी दारू, ४७ लोखंडी ड्राममधील ४ हजार ७०० लिटर कच्चा मोह रसायन सडवा व गावठी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ४२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी जमीनित लपवून ठेवलेला लोखंडी ड्राम मधील कच्चा मोह रसायन सडव्याचा शोध घेवून तो नष्ट केला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दहेगाव (गावंडे) येथील श्रावण तुळशीराम नागोसे (३५), सुभेता जमसिंग भोसले (३५) व रूबिना नवरसिंग भोसले (३०) दोन्ही रा. वायफड पारधी बेडा यांच्याविरुद्ध पुलगाव पोलिसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, ए. एस. सैय्यद, चेतन मराठे, प्रकाश लसुंते, विवेक धनुले, संजय रिठे, विजय चव्हाण, महेंद्र काबंळे, भारत पिसुड्डे, किशोर लंभाने, अनिल भोवरे, कासदेकर, अमोल हातराम, निकेश गुजर, उमेश उईके, पवन निलेकर, राहुल साठे, सीमा लोखंडे यांनी केली. परिसरात दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्यास माहिती देण्याचे आवाहन ठाणेदार बुराडे यांनी केले आहे.