३.४७ लाख क्विंटल कपाशीची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:26 PM2017-11-28T22:26:59+5:302017-11-28T22:27:37+5:30
पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : पावसाचा अनियमितपणा आणि आता कपाशीवर आलेली बोंडअळी यामुळे जिल्ह्यातीलच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी होईल, हे चित्र कायम असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर अखेरीस जिल्ह्यात सातही बाजार समितीतून ३ लाख ४७ हजार क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात असलेल्या सात बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. या सातही बाजार समितीतून कापसाची खरेदी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीला ४ हजार १५० ते ४ हजार ८५१ रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. यंदा कपाशीच्या उत्पानाची हमी नसल्याने हा दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर जिल्ह्यात असलेल्या १० बाजार समितीतून आतापर्यंत १ लाख २१ हजार २३६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. येथेही हाच दर मिळाल्याचे दिसून आले आहे.
वर्धा जिल्ह्यातच नाही तर कापूस उत्पादक असलेल्या भागात यंदा पावसाची अनियमितता कायम होती. यामुळे अनेकांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले होते. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होईल असे अनेकांना वाटत होते. यातच उत्पादन निघण्याच्या काळात बीटी कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. अळीच्या हल्ल्यामुळे होते नव्हते उत्पादन शेतकºयांच्या हातून जाण्याची वेळ आली. प्रत्येक बोंडात अळी आल्याने उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळाले. या अळीवर ताबा मिळविणे शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतात ट्रॅक्टर फिरविले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा एका वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर विभागात ३.७९ क्विंटल कापसाची खरेदी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कपाशीचे उत्पादन कमी होईल, हे चित्र खरे होत असल्याचे दिसत आहे.
नागपूर आणि वर्धा अशा नागपूर विभागात खासगी आणि शासकीय अशी एकूण ३ लाख ७९ हजार ३ क्ंिवटल कपाशीची खरेदी झाली आहे. वातावरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांत पहिल्याच वेच्यात कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येत्या दिवसात कपाशीची आवक आणखी कमी होईल असे संकेत सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे.
गत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत साडेनऊ लाख क्ंिवटलची आवक
गत हंगामात वर्धेत डिसेंबर अखेर पर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार क्ंिवटल कपाशीची आवक झाल्याची नोंद झाली होती. यंदा नोव्हेंबर अखेर पर्यंत साडेतीन लाख क्ंिवटलची आवक झाली आहे. शिवाय जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीमुळे हा आकडा पार होण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटीचे संकेत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी वर्धेत ३१.९२ लाख क्विंटल कापूस
गत हंगामात वर्धा जिल्ह्यात कपाशीची झालेली खरेदी ३१ लाख ९२ क्ंिवटल होती. यंदा यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. यातून २६ लाख ५० हजार क्ंिवटलचे उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र कपाशीवर असलेल्या संकटामुळे यंदा अपेक्षित उत्पादन होणेही शक्य नसल्याचे दिसून आले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे यंदाचे उत्पादन सरासरी २२ ते २३ लाख क्ंिवटलवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पणन महासंघाच्या केंद्रावर मुहूर्त नाही
नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यात कापूस पणन महासंघाची एकूण नऊ केंद्रे सुरू झाली आहेत. यात सहा केंद्र नागपूर आणि तीन केंद्र वर्धेत आहे. या नऊ पैकी एकाही केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नाही.