३५ प्रकल्पात नाममात्र जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:46 PM2017-07-30T23:46:13+5:302017-07-30T23:46:35+5:30

यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे.

35-parakalapaata-naamamaatara-jalasaathaa | ३५ प्रकल्पात नाममात्र जलसाठा

३५ प्रकल्पात नाममात्र जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा प्रारंभी समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण नागरिकांसह हवामान खात्याचे भाकित पावसाने फोल ठरविले आहे. अद्याप जिल्ह्यातील जलाशयांमध्ये नाममात्र जलसाठाच आहे. जिल्ह्यात १५ मोठ्या व मध्यम जलाशयात ३३.३१ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये २३ टक्केच पाणीसाठी असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
यावर्षी मान्सून वेळेवर सक्रिय होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला होता; पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकºयांसह सामान्यांची चिंता वाढली आहे. हीच स्थिती पूढेही कायम राहिल्यास जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील शेतकºयांना फटका बसला. बहुतांश शेतकºयांनी दुबार पेरणी केली. वेळोवेळी झालेला पाऊस पेरणीयोग्य राहिल्याने शेतकºयांनीही पेरणीची कामे पूर्ण केली आहे. शेतकºयांनाही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अद्याप नदी-नाले दुथडी भरून वाहतील, असा पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु जलाशयांतील पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीत बहुतांश जलाशये १०० टक्के भरली होती.
सध्या बोर प्रकल्पात १९.२८ टक्के, धाम प्रकल्पात २६.९५ टक्के, पोथरा ४३.३५ टक्के, पंचधारा ४४.२३, डोंगरगाव ३३.११ टक्के, मदन प्रकल्प ४४.३२ टक्के, मदन उन्नई धरण १७.७८ टक्के, लाल नाला प्रकल्प १७.४२ टक्के, नांद प्रकल्पात ३४.१४ टक्के, वडगाव प्रकल्पात ४१.१७ टक्के, उर्ध्व वर्धा धरण ४१.८६ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प १५.७९ टक्के, निम्न वर्धा २४.२८ टक्के तर बेंबळा प्रकल्पात २८.२७ टक्के जलसाठा आहे.
लघु प्रकल्पांतील सुकळी २८.८२ टक्के, कवाडी ४०.१४ टक्के, सावंगी १५.४४ टक्के, लहादेवी ३६.३० टक्के, पारगोठाण ८.४८ टक्के, अंबाझरी २९.७९ टक्के, पांजरा बोथली १५.५९ टक्के, उमरी २७.०७ टक्के, टेंबरी ९.४३ टक्के, आंजी-बोरखेडी ३३.८२ टक्के, दहेगाव (गोंडी) ४७.६२ टक्के, कुºहा २४.१५ टक्के, रोठा एक २०.८९ टक्के, रोठा दोन २१.५ टक्के, आष्टी ७.७४ टक्के, पिलापूर १४.२५ टक्के, कन्नमवारग्राम १०.३५ टक्के, मलकापूर ३.२६ टक्के, परसोडी १२.८ टक्के, हराशी ३०.९४ टक्के तर टाकळी-बोरखेडी तलावामध्ये २०.१० टक्केच जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशये तुडूंब भरली होती. तलावही ओव्हर फ्लो झाले होते; पण यंदा ५० टक्केही साठा झाला नाही. काही दिवस पाऊस न आल्यास भविष्यात पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे.

मागील वर्षी २० जलाशयात होता ५८.२५ टक्के साठा
मागील वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील २० लघु जलाशयात ५८.२५ टक्के पाणीसाठा होता. यंदा हा आकडा दमदार पाऊस न झाल्याने २३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १५ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ४७.२६ टक्के जलसाठा होता. त्यावेळी आष्टी तालुक्यातील पिलापूर तलाव १०० टक्के, मलकापूर जलाशय ९९.९ टक्के तर आर्वी तालुक्यातील कवाडी तलाव ९०.५८ टक्के भरला होता.

Web Title: 35-parakalapaata-naamamaatara-jalasaathaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.