३५ वर्षांनंतर विद्यार्थ्यांची भेट
By admin | Published: November 9, 2016 01:02 AM2016-11-09T01:02:59+5:302016-11-09T01:02:59+5:30
स्थानिक आर.के. हायस्कूल येथील शारदा सभागृहात १९८२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा : आर.के. हायस्कूलचा उपक्रम
नाचणगाव : स्थानिक आर.के. हायस्कूल येथील शारदा सभागृहात १९८२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा आयोजित करण्यात आला होता. वयाची पन्नाशी गाठलेले त्यावेळेचे विद्यार्थी अचानक झालेल्या पुनर्भेटीने गहिवरून गेले. याप्रसंगी त्यांना विद्यादानाचे कार्य केलेल्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. प्रशासकीय, व्यापार, उद्योग अशा विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी एक विलक्षण आनंद याप्रसंगी उपभोगत होते.
अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल तर अतिथी म्हणून प्रमिला नकाशे, रमेशचंद्र बदनोरे, अवथनकर, बोराडे, भट्टड, कोठावळे, देशमुख, लोणकर, व्यास, सुदामे हे शिक्षक उपस्थित होते.
त्या वेळचे विद्यार्थी व सध्या महसूल उपायुक्त असलेले जितेन पापडकर म्हणाले की, या गुरुजनांनी शिकविलेल्या ज्ञानामुळे आज या पदापर्यंत पोहोचलो. त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही. ग्रामीण भागासाठी कार्य करणे व त्या माध्यमातून समाजसेवा आपल्या हाताने घडावी, शासकीय योजनांचा अधिकाधिक सामान्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला.
माजी प्राचार्य रमेश बदनोरे यांनी हा पुनर्भेट नसून आनंद सोहळा असल्याचे सांगितले. पंखामध्ये बळ येईपर्यंत पक्षी घरट्यात राहतात व एकदा बळ आले की, ते उडून जातात; पण हे ३५ वर्षानंतर परत आलेले विद्यार्थी पाहून खरा आनंद झाला, असे सांगितले. लोणकर, अवथनकर, नकाश, अग्रवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. अशोक नंदेश्वर यांनी गायलेली कविता जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली. प्रास्ताविक अविनाश शहागडकर यांनी, संचालन धमेंद्र अंबादे यांनी केले तर आभार राजेश जुनोनकर यांनी मानले. कार्यक्रमाला राजेश भंसाळी, आनंद जीवणे, अशोक नंदेश्वर, रवी पतालिया, प्रमोद नितनवरे, पनपालिया, ज्योत्स्ना कंटाळे, सहारे, सोनी, ठोंबरे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)