३५ वर्षांपासून ते देतात दवंडी

By admin | Published: May 10, 2014 12:25 AM2014-05-10T00:25:10+5:302014-05-10T00:25:10+5:30

सर्व गावकरी लोकांना कळविण्यात येते की.... तरी सर्वांनी याची नोंद घावी हो... अशी आरोळी ठोकत घंटीचा टन टन आवाज करीत तो एका वॉर्डातून दुसरीकडे जातो.

For 35 years, they offer davandi | ३५ वर्षांपासून ते देतात दवंडी

३५ वर्षांपासून ते देतात दवंडी

Next

 हर्षल तोटे - पवनार

सर्व गावकरी लोकांना कळविण्यात येते की.... तरी सर्वांनी याची नोंद घावी हो... अशी आरोळी ठोकत घंटीचा टन टन आवाज करीत तो एका वॉर्डातून दुसरीकडे जातो. पुन्हा दवंडी सुरू. लहान मुले मागे मागे हो म्हणत धावतात. हा प्रकार नित्याचा म्हणता म्हणता पवनारातील दौलतराव हिवरे यांच्यासाठी आता ३५ वर्षांचा झाला. सार्वजनिक स्वरूपातील माहिती गावात या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे ‘दवंडी’. गावात ठरलेल्या चौकामध्ये घंटीचे ठोके मारून नागरिकांना गोळा करणे व ऐका हो ऐका अशी सुरुवात करून सर्व माहिती सांगणे ही दवंडीकराची जबाबदारी. प्रत्येक गावामध्ये दवंडी देणाराही ठरलेला. पवनारमध्ये दौलतराव हिवरे (७६ वर्षे) हे गत ३५ वर्षांपासून दवंडी देण्याचे काम करीत आहेत. ३५ वर्षे दवंडी देण्याचा हा बहुदा एक विक्रमच असावा़ सुरुवातीच्या काळात गावात चैतू मुंगले, रंजन वानखेडे, दौलत वडे यांनी दवंडीचा भार सांभाळला; परंतु त्यांची दवंडी देण्याची कारकिर्द फार अल्पशी होती़ दौलत वडे आजारी पडल्यानंतर १९७८ साली दौलत हिवरे यांनी दवंडीचे काम हाती घेतले ते आजतागायत सुरूच आहे. त्यावेळेस त्यांनी २० रुपये दवंडी विकत घेतली होती व ती देण्याकरिता त्यांना फक्त ७ रुपये मिळायचे़ कमीत कमी ५० ठिकाणी दवंडी देण्याकरिता त्यांना दोन तास लागायचे़ आता त्यांना दवंडीपोटी २०० रुपये मिळत असून गावात १०४ ठिकाणी दवंडी द्यावी लागते़ याकरिता कमीत कमी चार तास लागतात़ दरवर्षी ग्रा़ पं़ च्या ५० व इतर ५० अशा जवळपास १०० दवंडी तरी त्यांना द्यावा लागतात़ याच व्यवसायातून त्यांनी तीन मुलांचे, दोन मुलींचे लग्न, घराचे बांधकाम व दैनंदिन गरजा पूर्ण केल्याचे ते अभिमानाने सांगतात़ वयाची ७६ वर्ष त्यांनी पूर्ण केली असून दवंडीच्या कामाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खणखणीत आवाजात ५० लोक ऐकतील अशी दवंडी ते देतात. अजून किमान दोन वर्ष तरी हे काम आपण करणार असेही ते अभिमानाने सांगतात. असे असले त्यांचा हा दंवडी देण्याचा वारसा कोण पुढे नेणार असा प्रश्न समोर येत आहे.

Web Title: For 35 years, they offer davandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.