जलाशयात ३५.२० टक्केच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:13 PM2018-07-27T22:13:32+5:302018-07-27T22:14:33+5:30
यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांच्या अडचणीत भर पडली होती. त्यातच शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला. याच कालावधीत जिल्ह्यातील पोथरा हा प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु, जिल्ह्यातील इतर दहा प्रकल्पांच्या पाणी पातळीत नाममात्र वाढ झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैच्या चौथ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गतवर्षी होता २५.४९ टक्के जलसाठा
गत वर्षी जिल्ह्यातील ११ प्रकल्पात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २५.४९ टक्केच जलसाठा होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्पात सरासरी ३५.२० इतका जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जलसाठा सध्या जलाशयांमध्ये जादा असला तरी अनेकांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे.
गत वर्षी पावसाळ्याच्या अखेरीस भरले जलाशय
गत वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे जलसंकटाला सामोरे जावे लागेलच असा विश्वास अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र, पावसाळ्याच्या अखेरीस वर्धा जिल्ह्यावर वरुणराजा मेहरबानच झाला. त्यामुळे त्यावेळी जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली होती. यंदाही पावसाळ्याच्या अखेरीसच वरुणराजा जिल्ह्यावर मेहरबान होत जलाशय फुल्ल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.