पालिकेची करवसुली ३५.६४ लाखांवर
By admin | Published: April 5, 2017 12:39 AM2017-04-05T00:39:38+5:302017-04-05T00:39:38+5:30
मागील दोन महिन्यांपासून ३१ मार्चचे ध्येय समोर ठेवून २०१६-१७ या वर्षाची मालमत्ता कर वसुली
सिंदीने गाठला उच्चांक : विकास निधीचा मार्ग मोकळा
सिंदी (रेल्वे) : मागील दोन महिन्यांपासून ३१ मार्चचे ध्येय समोर ठेवून २०१६-१७ या वर्षाची मालमत्ता कर वसुली स्थानिक नगर पालिकेद्वारे करण्यात येत आहे. ४१ लाख ३३ हजारांचे उद्दिष्ट गाठताना पालिकेने ३५ लाख ६४ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. ही टक्केवारी ८६ टक्के झाल्याने सिंदी रेल्वे नगर पालिकेने वसुलीचा उच्चांक गाठला आहे.
शासनाने मालमत्ता कराची वसुली महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदांना सक्तीची केली आहे. परिणामी, सर्व नगर परिषदांतील मुख्याधिकारी तथा कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. ३१ मार्चपर्यंत पालिकेने मालमत्ता कराची वसुली केली नाही तर कर्मचाऱ्यांचे पुढील मासिक वेतनही थांबविण्याचा सज्जड दम तोंडी आदेशांद्वारे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी न.प. च्या मुख्याधिकारी व प्रशासनाला दिला होता. याचीच फलश्रूती म्हणून मोठ्या प्रमाणात थकित मालमत्ता कर वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.
सिंदी (रेल्वे) नगर परिषदेकडे एकूण ३ हजार ४०४ मालमत्ता कर धारक आहेत. २०१५-१६ मध्ये १८ लाख २७ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकित होता. यापैकी १७ लाख ४९ हजार रुपये (९५.७२ टक्के) मालमत्ता कर पालिकेने वसुल केला. २०१६-१७ मध्ये चालू कर २३ लाख ५० हजार असून १८ लाख १४ हजार रुपये (७८.१२टक्के) कर वसूल केला. २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये एकूण ४१ लाख ३३ हजारांपैकी ३५ लाख ६४ हजार म्हणजेच ८६.८४ टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात नगर पालिका प्रशासनाला यश आले आहे.
यासाठी न.प. मुख्याधिकारी रवींद्र ढाके यांच्या नेतृत्वात चार-चार कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. ६० दिवसांपासून सतत मालमत्ता कर वसुलीची मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने न.प. कर विभागाचे सहायक कर निरीक्षक आर.के. गड्डमवार, लेखापाल रमेश उगे व सहा. निरीक्षक सलील बेग यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी कर वसुलीबाबत उत्कृष्ट कार्य करून मालमत्ता कराची वसुली केली. यामुळे न.प.च्या उत्पन्नातही भर पडली आहे.
२०१७-१८ मध्ये कर निर्धारणास्तव पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामुळे थकित असलेल्या करावर व्याज आकाण्यात येणार आहे. उर्वरित थकित मालमत्ता करधारकांनी १० एप्रिलपर्यंत पालिकेमध्ये कर जमा करावा, असे आवाहनही न.प. मुख्याधिकारी रवींद्र ढाके यांनी केले आहे.(प्रतिनिधी)