रेल्वेच्या वर्धा स्थानकावर आठ महिन्यांत 36 हजार फुकटे प्रवासी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 10:33 PM2022-09-28T22:33:01+5:302022-09-28T22:39:08+5:30
एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वर्धा विभागाने केलेल्या वर्धा स्थानकावरील कारवाईत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३६ हजार फुकटे प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाख ९९ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरून सध्या प्रवासी आणि गाड्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे.
योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा
- सध्या तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
- तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वर्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तर तुरुंगवासाचीही तरतूद....
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६ हजारांवर जाऊन पोहोचली असून, त्यांच्याकडून दंडही आकारण्यात आला आहे. अशा सर्व फुकट्या प्रवाशांना रेल्वेच्या नियमांनुसार दंड भरावाच लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेच्या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षाही केली जाईल, असा इशाराही रेल्वेने दिला आहे.
दंडाच्या रकमेत वाढ केल्यास बसेल चाप
रेल्वेत दररोज हजारो प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या प्रवाशांकडून रेल्वेने १ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल केला. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी वेळोवेळी रेल्वेकडून मोहीम राबविली जाते. मात्र, तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. रेल्वेच्या मते, दंडाच्या रकमेत वाढ केल्यास नक्कीच विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप बसेल, हे खरे.