महसूलचे धाडसत्र; ३७० ब्रास वाळूसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:45 IST2023-06-16T13:43:45+5:302023-06-16T13:45:52+5:30
शहरात दोन ठिकाणी धाड : सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

महसूलचे धाडसत्र; ३७० ब्रास वाळूसाठा जप्त
वर्धा : शहरानजीकच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधपणे साठवलेल्या वाळू साठ्यावर महसूल प्रशासनाने धाड टाकून ३७० ब्रास वाळू जप्त केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
शहरानजीक नागठाणा व दत्तपूर येथील एका लेआउटच्या ओपन स्पेसमध्ये अवैधपणे वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती महसूल प्रशासनास आज दुपारी प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने धाड टाकली.
नागठाणा परिसरात घातलेल्या धाडीत ३०० ब्रास वाळूसाठा आढळून आला. त्यानंतर दत्तपूर येथील एका लेआउटमधील ७५ ब्रास वाळूसाठा आढळून आला. या कारवाईमध्ये वर्धेचे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. जप्त केलेला वाळूसाठा तहसीलदार कोळपे यांच्या ताब्यात देण्यात आला असून, साठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. जप्त केलेला हा वाळूसाठा नोंदणी केलेल्या व प्रतीक्षा यादीतील घरकुल लाभार्थींना विनामूल्य देण्यात येणार आहे.