तीन दिवसांत ३८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:35 AM2019-02-09T00:35:30+5:302019-02-09T00:36:16+5:30
सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मागील तीन दिवसात ४४ वाहनांची तपासणी करून ३८ वाहनचालकांवर कारवाई केली. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक नियमांना बगल देणाऱ्यांवर सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून कारवाई केली जात आहे. मागील तीन दिवसात उपप्रादेशिक परिवहन विभागाने ४४ वाहने तपासली. शिवाय वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºया चौघांवर, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१ जणांवर, अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्याने नऊ वाहनचालकांवर आणि आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा केल्या प्रकरणी चार आॅटोचालकांवर कारवाई केली आहे. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
४० वाहनांना लावले ‘रिफ्लेक्टर’
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर असणे गरजेचे आहे. परंतु, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे निदर्शनास आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत सुमारे ४० वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे. शिवाय वाहतूक नियमांना बगल दिल्याचे निदर्शनास असल्याने रापमच्या बसचालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.