३.८६ लाखांचे धान्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:00 AM2017-11-10T01:00:48+5:302017-11-10T01:01:00+5:30
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स नामक दुकानात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स नामक दुकानात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सदर गोदामात धाड घातली असता मोठ्या प्रमाणात शासकीय गहू आणि तांदळाचा साठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गोदामात पोलिसांनी धाड टाकली असता येथे शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात रिपॅकींग होत असल्याचे समोर आले. आर्वी पोलिसांनी मदतीने केलेल्या या कारवाईत दुकान मालक निरज सुरेश जोशी रा. स्टेशन वॉर्ड, आर्वी हा गोदामातच हजर मिळून आला. सदर गोदामामध्ये अवैधरित्या साठवणुकीचे स्वस्त धान्य गहु भरून असलेले सरासरी ५० किलो वजनाचे १७२ पोते, अॅप्पल ब्रॅन्ड असलेले स्वस्त धान्य तांदुळ भरुन असलेले सरासरी ५० किलो वजनाचे २०२ पोते, सरकारी स्वस्त धान्याचे खाली पोते, पोत्यांच्या शिलाईकरिता शिलाई मशीन इत्यादी असा एकूण किंमत ३ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आरोपीस ताब्यात घेवून स्वस्त धान्याच्या अवैध साठवणुकीकरिता आर्वी पोलीस ठाण्यात कलम ३,७ जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात स्वस्त धान्याच्या अवैध तस्करीची व्यवसायास मोठी खीळ बसली असून यासंबंधाने या व्यवसायात सहभागी असणारे मोठे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात निरीक्ष्रक पराग पोटे, आर्वीचे ठाणेदार प्रभारी अशोक चौधरी, अचल मलकापुरे यांच्या संयुक्त निर्देशावरुन जितेंद्र चांदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार सलाम कुरेशी, नरेंद्र डहाके, नापोशि किशोर आप्तुरकर व स्थानिक पोलीस ठाण्याचे हवालदार विक्की म्हस्के, अमित जुवारे यांनी संयुक्तपणे केली आहे.