बाल महोत्सवात ४०० चिमुकल्यांनी केला पक्षी, निसर्गाचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:01 PM2018-03-22T22:01:03+5:302018-03-22T22:01:03+5:30
नई तालीम समिती परिसरातील शांती भवनात तीन दिवसीय बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : नई तालीम समिती परिसरातील शांती भवनात तीन दिवसीय बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या सुमारे ४०० चिमुकल्यांनी पक्षी, प्राणी, निसर्ग यांच्या अभ्यास करीत प्रात्यक्षिकातून ज्ञानार्जन केले. महोत्सवाचा समारोप बुधवारी करण्यात आला.
नई तालीम समिती, शिक्षण विभाग वर्धा, जिल्हा शैक्षणिक सा. व्य. वि. संस्था व बजाज समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाला ज्येष्ठ व्याख्यात्या प्रा.डॉ. रेखा महाजन, सरपंच रोशना जामलेकर, संजय सोनटक्के, विद्यार्थी प्रतिनिधी पालय शिवरकर, तणू वाणी, रसिका केकापुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच जामलेकर यांनी शिबिरातून विद्यार्थ्यांना आनंद मिळाला, ते येथे रमल्याचे चेहऱ्यावर दिसून येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद होऊन विचारांची आदानप्रदान झाली असेल. येथे जे काम केले, जे शिकले, त्याचा दैनिक जीवनात उपयोग करा, असे सांगितले. सोनटक्के यांनी शिबिर म्हणजे गंमत-जमत, नवीन काही पाहायला मिळाले व शिकायला मिळाले. या ठिकाणावरून गेल्यावर काही विसरू नका. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोबाईल बाजूला ठेवा. मित्र-मैत्रिणीचा गट तयार करा आणि आपल्या गावातील पक्षी, प्राणी, झाडे, फळे आदींची माहिती गोळा करा. याचा अभ्यास करा. भविष्यात नक्कीच याचा उपयोग होणार, असे सांगितले. पायल शिवरकर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करीत बाल महोत्सव ही गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जामलेकर व सोनटक्के यांच्या हस्ते शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बाल जगत तथा खादीची थैली देऊन प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. संचालन समन्वयक प्रा.डॉ. प्रभाकर पुसदकर यांनी केले. महोत्सवाला डॉ. शिवचरण ठाकूर, विजय कुरूले, संदीप भगत, पवन गणवार, रूपेश कडू, राजू चौधरी, गजानन गुरनूले, देवेंद्र गाठे, डॉ. सीमा पुसदकर, अनुश्री दोडके, उर्मिला हाडेकर, मंगला डोंगरे, वैशाली चिकाटे, अनिता भारती, सीमा मेहता, न्यू आर्टस व प्रियदर्शिनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील ४०० विद्यार्थी, १०० शिक्षक व शिक्षिका आणि ५५ शाळा सहभागी झाल्या होत्या.
पपेट शो, पितळी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण
तीन दिवस विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. मनोरंजासह शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत माहिती घेतली. पितळी वस्तू कशा बनवितात याची माहिती इंद्रजीतने दिली. पपेट शो नाव नव्या पिढीला माहिती असले तरी भारतात कठपुतळ्या खेळ होता. याचा इतिहास पद्मीनी रंगराजनने सांगितला. विद्यार्थ्यांनी यातून ज्ञान व आनंद घेतला. बाहुली बाहुल्याचे लग्न प्रत्यक्ष अनुभवले. सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांना संधी मिळाली. पर्यावरण व गांधीजींच्या जीवनावर लघुपट दाखविला. योग, व्यायाम, श्रमदान, आश्रम प्रार्थना, व्याख्यान, खेळ, गटचर्चा, मुक्त वेळ असा दैनिक क्रम होता.