४०० किलो रद्दी विकून गरजूंना दिल्या वस्तू
By Admin | Published: March 11, 2017 12:36 AM2017-03-11T00:36:35+5:302017-03-11T00:36:35+5:30
रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून काबाडकष्ट करणाऱ्या गरजुंना छत्री व चप्पलचे वितरण करण्यात आले.
उन्हापासून बचावाकरिता चप्पलचे वाटप : भाजयुमो आणि सेवार्थ फाऊंडेशनचा उपक्रम
वर्धा : रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून काबाडकष्ट करणाऱ्या गरजुंना छत्री व चप्पलचे वितरण करण्यात आले. याकरिता भाजपा युवा मोर्चा तसेच सेवार्थ फाऊंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी ४०० किलो रद्दी गोळा करून त्याही विक्री करीत निधी उभा केला. या अभिनव उपक्रमातून गरजूंना कपडे तसेच उन्हापासून बचावासाठी छत्री व चप्पल भेट दिली.
भाजयुमोचे महामंत्री हर्ष तिवारी यांनी सेवार्थ फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम राबविला. आजही समाजात आर्थिकदृष्टया मागास असलेल्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेस्टेशन, बस स्थानक, शहरातील मंदिरांपुढे अनेक गरजू दिसतात. मिळेल ते खाऊन त्यांचा उदरनिर्वाह होतो. पायात चप्पल नसते तर डोक्यावर छत नसल्याने उन्हात तसेच राहावे लागते. त्यांना सावली मिळावी म्हणून युवकांनी पुढाकर घेत हा उपक्रम राबविला.
हर्ष तिवारी यांनी सहकारी व मित्रांकडून सुमारे ४०० किलो रद्दी गोळा केली. ती रद्दी विकून त्यातून मिळालेल्या पैशातून चप्पल व कपडे उन्हापासून वाचण्यासाठी छत्र्या विकत घेतल्या. हे सर्व साहित्य शहरातील मंदिर, रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी असलेल्या गरजूंना भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ शेकडो गरजुंना मिळाला.
यावेळी भाजपाचे प्रशांत बुर्ले, विरू पांडे, अभिषेक त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेवार्थ फाऊंडेशनचे विशाल तिवारी, गौरव अग्निहोत्री, चेतन भुतडा, अमित चौबे, आयुष पालीवाल, अंकीत इंगळे, शुभम महत्वाने, चेतन दोषी, शुभम साहू, अंकीत परियाल, जतीन पटेल, अभिषेक तिवारी, बिरजू श्रीवास, रजत शर्मा, रोहित शर्मा, संकेत प्रजापती, राहुल बाजपेयी, शुभम जयस्वाल, दुष्यंत पटेल, मयुर तिवारी, राम पांडे, बंटी लोंढे, लखन लोंढे, अजय हातागळे, आकाश राखडे, कुमार शेंडे, हर्षल चोरतकर, नवीन अग्निहोत्री, अमीत पांडे, श्रावण दखोले आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)