तब्बल ४१८ हातपंप उन्हाळ्यात सोडतात जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:16 AM2018-03-10T00:16:53+5:302018-03-10T00:16:53+5:30
नागरिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी हातपंप उभे केले.
रूपेश खैरी ।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नागरिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी हातपंप उभे केले. यातील बहुतांश हातपंप नाममात्र असून तब्बल ४१८ हातपंप ऐन उन्हाळ्यात जीव सोडत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्यावतीने केलेल्या सर्व्हेत उघड झाले आहे. ऐन पाणी टंचाईच्या दिवसात हातपंप कोरडे पडत असल्याने त्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याकरिता नागरिकांची होणारी भटकंती रोखण्याकरिता हातपंप देण्याचा शासनाचा निर्णय होता. हा हातपंप देण्याकरिता शासनासह लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदार संघात हातपंप देण्याची मुभा देण्यात आली. याकरिता त्यांना विशेष निधीही देण्यात आला. या निधीतून या लोकप्रतिनिधींनी मागेल त्या गावात हातपंप दिले. यातून पाण्याची समस्या मिटेल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गावाकºयांच्या सोईकरिता नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोईकरिता हातपंप दिल्याचे दिसून आले.
या प्रकारातून जिल्ह्यात एकूण ४ हजार ७६१ हातपंप उभे झाले. गाव, तांडा, बेघर वस्ती, बसस्थानक असो की शहरातील वॉर्ड वा गल्ली या ठिकठिकाणी हातपंप देण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात अनेक सार्वजनिक ठिकाणी हातपंप लावण्याचा सपाटा सुरू झाला तो आजही सुरूच आहे; पण त्याला आजस्थितीत काही प्रमाणात ब्रेक बसल्याचे दिसत आहे. पाणी टंचाई निवारण्याकरिता हातपंप देण्यात येत असताना ऐन उन्हाळ्यात ते कोरडे पडत असल्याने हे हातपंप कुचकामी पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात गावातगावात असलेले पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले की या हातपंपावर गर्दी होते. मात्र ज्यागावात टंचाई आहे अशा गावातील अनेक हातपंप ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आटत आहेत. यामुळे हे हातपंप गरजेच्यावेळी कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. उन्हाळ्यापुर्वी हे हातपंप जीव सोडत असताना त्यांच्या दुरूस्तीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
एकूण २९९ हातपंप कायमस्वरूपी बंद
विविध ठिकाणी असलेल्या एकूण हातपंपांपैकी तब्बल २९९ हातपंप कायमस्वरूपी बंद पडले आहेत. बंद पडलेल्या हातपंपाचे सांगाडेही बेपत्ता झाले आहेत. या पंपांच्या पाईपला शासनाच्यावतीने गोल पट्टी लावून बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी शाखेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
४०४६ हातपंपांना बारमाही पाणी
जिल्ह्यात असलेल्या हातपंपांपैकी एकूण ४ हजार ४६ हातपंपांना बारमाही पाणी असल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पंपांप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या सर्वच हातपंपांना उन्हाळ्याच्या दिवसातही पाणी असावे याकरिता शासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे.
टंचाई आराखड्यातील खर्चानंतरही हातपंप कोरडेच
गावागावांत निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई निवारण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात येतो. असे असतानाही हे हातपंप दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात कोरडे पडण्याचा प्रकार वर्षानुवर्षे कायम राहत आहे. यामुळे हा निधी नेमका कोणत्या कामांवर खर्च होतो, याचा शोध जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेण्याची गरज आहे. यातून मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.