चिंता वाढली! अवघ्या २३ दिवसांत ४,२०६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 06:21 PM2022-01-24T18:21:26+5:302022-01-24T18:25:41+5:30
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे.
वर्धा : जिल्ह्यात कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असून मागील अवघ्या २३ दिवसांच्या काळात तब्बल ४ हजार २०६ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने कोरोना संदर्भातील त्रि-सूत्रीचे पालन करून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या नवीन काेविड बाधितांत जिल्ह्याबाहेरील ९९ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे.
* २३ दिवसांतील एकूण कोविड बाधित : ४,२०६
* कोविड बाधित पुरुष : २,६३८
* कोविड बाधित महिला : १,५६८
* जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित : ९९
तालुकानिहाय नवीन कोविड बाधितांची स्थिती
आर्वी : १५६
आष्टी : १०६
देवळी : ५८२
हिंगणघाट : ८०८
कारंजा : ११५
समुद्रपूर : १२८
सेलू : १७५
वर्धा : २,०३७
आठवडी पॉझिटिव्हीटी दर पोहोचला ३८.४१ टक्क्यांवर
१७ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ७ हजार ५१९ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८८८ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या आठवड्याचा जिल्ह्याचा कोविड आठवडी पॉझिटिव्हीटी दर ३८.४१ टक्के असल्याचे सांगण्यात आले.
गत आठवड्यात पॉझिटिव्हीटी दर होता २०.०७ टक्के
१० ते १६ जानेवारी या काळात जिल्ह्यात ५ हजार ३९१ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता १ हजार ८२ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. १० ते १६ जानेवारी या आठवड्यात जिल्ह्याचा कोविड आठवडी पॉझिटिव्हीटी दर २०.०७ टक्के होता.
रुग्ण दुप्पट होण्याची गती वाढली
१० ते १६ जानेवारी या सात दिवसांच्या काळात जिल्ह्यात १ हजार ८२ नवीन कोविड बाधितांची भर पडली. तर १७ ते २३ जानेवारी या सात दिवसांत तब्बल २ हजार ८८८ नवीन काेविड बाधित जिल्ह्यात सापडले आहेत. एकूणच पूर्वीच्या तुलनेत सध्या जिल्ह्यात कोविड रुग्ण दुप्पट होण्याची गती वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
तासी आठची गती
मागील २३ दिवसांतील ५५२ तासांत जिल्ह्यात ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. एकूणच मागील २३ दिवसांत तासी आठ नवे रुग्ण सापडल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.