एका झाडावर ४३३ रुपयांचा खर्च
By admin | Published: June 28, 2017 12:47 AM2017-06-28T00:47:24+5:302017-06-28T00:47:24+5:30
शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला.
तरीही ६४० वृक्ष वाळले : ग्रा.पं.त आठ मजूर कार्यरत
हर्षल तोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात १ जुलै २०१६ पासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यात पवनार ग्रामपंचायतीच्यावतीने २,००० वृक्ष लागवड केली. आज त्यापैकी १,३६० वृक्ष जिवंत आहे. या झाडांच्या संगोपनासाठी जुलै २०१६ पासून किमान आठ मजूर कार्यरत आहे. एका मजुराच्या मागे १९३ रुपये रोजाप्रमाणे एका वर्षाचे ५ लक्ष ६३ हजार ५६० रुपये खर्च झाले. १३६० झाडेच जगल्यामुळे एका झाडाच्या संगोपनासाठी जवळपास ४३३ रुपये खर्च झाल्याचे दिसते.
शासनाच्या नियमानुसार किमान दोन वर्ष या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे. यामध्ये झाडांच्या लागवडीचा खर्च समाविष्ट नाही. गतवर्षी मोठा गाजावाजा करीत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रोपट्यांची लागवड करीत सेल्फी काढून घेतल्या; परंतु ज्या रोपट्याची काय अवस्था आहे, ते जिवंत आहे की मेले याकडे मात्र अजिबात लक्ष दिले नाही. सर्व व्यवस्था, सोयी असताना इतक्या मोठया प्रमाणात रोपटे का नष्ट झाले यावर मंथन करणे गरजेचे आहे.
आता पुन्हा १ जुलैला वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. त्या लागवडीमध्ये किमान ८० टक्के वृक्ष हे जिवंत राहिलेच पाहिजे हे निकष लावणे गरजेचे आहे. तरच झालेल्या खर्चाचा खऱ्या अर्थाने फायदा होईल, वृक्ष संवर्धनामध्ये शेतकरी प्रामुख्याने पुढाकार घेत असतो; परंतु माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी बांधावरील वृक्षाची तोड केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन केल्यास अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केल्यास बांधावरील वृक्षाची संख्या झपाट्याने वाढू शकते.
शासनाला रोजगार हमी योजनेत गरजूंना कामे देणेही महत्त्वाचे आहे. त्यांना वृक्षलागवडीऐवजी जलसंधारण, फळबागा लागवड, साफ सफाई, नर्सरीची निर्मिती यासारखी कामे दिल्यास ती ही अडचण दूर करता येवू शकते. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेले अनेक भुखंड रिकामे आहेत. या ठिकाणी बागा, खेळाचे मैदान रोजगार हमी योजनेतून तयार केले जाऊ शकतात. यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडू शकते. योग्य नियोजनाने या गोष्टी शक्य आहेत, परंतु फक्त कागदोपत्री योजना कश्या राबवायच्या याकडेच अधिकाऱ्यांचा कल असल्याने १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण झाले. यातील किती वृक्ष जगले याचे संशोधन केल्यास खरे वास्तव कळल्याशिवाय राहणार नाही.