४४ तलाव गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:05 PM2018-11-12T23:05:19+5:302018-11-12T23:05:39+5:30
जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या जोडीला शासनाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान राबविले असून याचे सुखद परिणाम सध्या जिल्ह्यात दिसत आहे. साखरा गावातील एका शेतकऱ्याने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे कापसाचे उत्पादनात ५ पटीने वाढ झाली आहे.
जलयुक्त शिवार या योजनेसारखीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शासनाने सुरू केली. जिल्ह्यात यावर्षी ४४ तलावातील ११ लक्ष २३ हजार ४५ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. यामध्ये हिंगणघाट समुद्रपूर, आर्वी व कारंजा तालुक्यातील सुमारे ५०० शेतकºयांनी स्वखर्चाने गाळ काढून नेला. तर काही शेतकºयांनी काढलेला गाळ स्वखर्चाने शेता पर्यंत नेला. याचा अतिशय चांगलाच फायदा शेतकºयांना झाल्याचे दिसते. साखरा या गावात दिवाकर कांबळी यांच्या शेतात तलावातील गाळाने चमत्कारच केला आहे. दिवाकर व त्यांच्या वडिलांची १५ एकर शेती गावातील तलावाला लागून आहे. कांबळी यांचे शेत म्हणजे मुरमाड जमीन. यामध्ये दरवर्षी कापसाचे एकरी २ क्विंटल उत्पादन होत होते; पण तलावातील सुपीक गाळ त्यांच्या शेतीसाठी फायद्याचाच ठरला आहे.
साखरा गाव तलावातील गाळ २५ शेतकऱ्यांना ठरला लाभदायक
समुद्रपूर तालुक्यातील साखरा गावाच्या बाहेर असलेल्या ८ हेक्टरवरील या गाव तलावातून १० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. तलावातील गाळ काढण्याचे काम मे महिन्यात जि.प. लघुसिंचन विभागाने अनुलोमच्या सहकार्याने लोक सहभागातुन सुरू केले. या तलावातून गावातील २५ शेतकºयांनी १० हजार घनमीटर गाळ नेला आहे. दिवाकर कांबळी त्यातीलच एक शेतकरी असून त्यांनी स्वत: १८५३ ट्रॉली गाळ १२ एकर शेतात ६ इंच थर होईल याप्रमाणे टाकला. यासाठी त्यांनी २२ ट्रॅक्टर कामाला लावले होते. गाळ काढून वाहून नेण्यासाठी त्यांना साडेपाच लक्ष रुपये खर्च आला. केवळ २५० रुपये ट्रॉली मध्ये त्यांना हा गाळ मिळाला. यामध्ये डिझेलचा ७२ हजार रुपयांचा खर्च शासनाने केला. याचा अतिशय सुखद परिणाम त्यांना यावर्षी खरीप हंगामात पाहायला मिळाला.
एकरी उत्पादनात वाढ
ज्या शेतात एकरी २ क्विंटल कापूस व्हायचा. तेथे त्यांना पहिलाच वेचा ५५ क्विंटल झाला आहे. आणखी ३० क्विंटलचे दोन वेचे निघतील असा अंदाज या शेतकऱ्यांना आहे. म्हणजे एकरी ९.५ क्विंटलचे सरासरी उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. त्यांच्या नेहमीच्या उत्पादनाच्या हे ५ पट आहे असे दिवाकर कांबळी यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांचे गाळ टाकलेले १२ एकर शेत आणि गाळ न टाकलेल्या ३ एकर शेतीतील पिकाच्या गुणवत्तेतील फरक लगेच लक्षात येतो. ३ एकर शेतातील पऱ्हाटीला केवळ पाच ते सहा बोंड दिसतात आणि त्याची वाढ सुद्धा २ फुटाच्या वर झालेली दिसत नाही.
समुद्रपूर तालुक्यात ३५ हजार ९२३ घनमीटर गाळाचा उपसा केला. १६५ शेतकºयांनी याचा लाभ घेतला आहे. यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता वाढली असून शेतकºयांच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे सुखद चित्र दिसत आहे.
- हेमंत गेहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, जि. प. वर्धा.
तलावातील गाळामुळे माज्या शेतीचा पोत सुधारला आहे. त्याचा फायदा लगेच यावर्षी दिसून येत आहे. मला गाळ टाकण्यासाठी आलेला सर्व खर्च यावर्षीच निघणार आहे. शेवटचा एक पाऊस आला असता तर कापसाचे उत्पादन यापेक्षाही जास्त झाले असते.
- दिवाकर कांबळी, शेतकरी, साखरा.