८८ विद्यार्थ्यांकरिता ४.४० लाख
By admin | Published: July 4, 2016 01:36 AM2016-07-04T01:36:51+5:302016-07-04T01:36:51+5:30
चिमुकल्यांत विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांची संशोधक वृत्ती जोपासल्या जावी याकरिता केंद्र ..
इन्स्पायर्ड अवॉर्डचे आॅनलाईन अर्ज : प्रतिकृतीकरिता अनुदान मंजूर
रुपेश खैरी वर्धा
वर्धा : चिमुकल्यांत विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांची संशोधक वृत्ती जोपासल्या जावी याकरिता केंद्र शासनाकडून जिल्हास्तरावर ‘इन्स्पायर्ड अवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शन घेण्यात येते. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची प्रतिकृती तयार करण्याकरिता पाच हजार रुपये देण्याचा नियम आहे. यानुसार या सत्रात होणाऱ्या प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील काही शाळांनी आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. यातील काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ८८ बालवैज्ञानिकांना त्यांची प्रतिकृती तयार करण्याकरिता प्रत्येकी पाच हजार असे एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारे इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रदर्शन जाहीर होताच प्रतिकृतीकरिता असलेले पाच हजार रुपये देण्यात येते. यातील ५० टक्के रक्कम प्रतिकृतीकरिता तर उर्वरित रक्कम विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकाला विज्ञान प्रदर्शनातील सहभागावर खर्च करावयाचे आहे. यंदाच्या इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. आॅगस्ट महिन्याच्या १५ तारखेपूर्वी ते घेण्याच्या सूचना आल्या आहेत. यंदाच्या अवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन वर्धा व नागपूर या दोन जिल्ह्याच्या संयुक्त सहभागातून करण्याच्या सूचना आहेत. यामळे जिल्ह्यातील काही शाळांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याकरिता आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यातील ८८ विद्यार्थ्यांचा या अवॉर्ड करिता प्रवेश पक्का झाला आहे.
विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात गोडी निर्माण होण्याकरिता प्रोत्साहन म्हणून ही रक्कम देण्यात येते. यात विद्यार्थ्यांने त्याच्या आवडीचा प्रयोग सादर करावा, त्याची कल्पना मांडावी असा आहे. मात्र त्यांना मिळणाऱ्या पाच हजार रुपयांकरिता अनेकांकडून दुकाने थाटण्यात आली आहे. काही शिक्षकांच्या माध्यमातून तयार प्रतिकृती देऊन ती प्रदर्शनात ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मूळ उद्देशाला बगल मिळत असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचे इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शन यंदा नागपुरात
यंदाच्या शैक्षणिक सत्रात होणार असलेली विज्ञान प्रदर्शन दोन जिल्हे मिळून होणार आहे. यात वर्धा व नागपूर या दोन जिल्ह्याचे एकीकरण करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ आॅगस्ट पूर्वी घेण्याच्या सूचना आल्या आहेत. दोन गटात होणार असलेल्या या प्रदर्शनात शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे कळविण्यात आले आहे. यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शाळांतील ८८ विद्यार्थ्यांचा प्रवेश पक्का झाला असून इतर शाळांना प्रदर्शनाची माहिती देण्याच्या सूचना आहेत.