४.४५ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:19 PM2017-11-07T23:19:11+5:302017-11-07T23:19:28+5:30
विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी नाकाबंदी करीत ४.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी नाकाबंदी करीत ४.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
प्राप्त माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने सकाळी नाकाबंदी केली. दरम्यान, मोटर सायकल क्र. एमएच ३२ एसी १२२७ द्वारे विशाल भूजंग पवार, प्रकाश चंफतराव बोरकर दोन्ही रा. शिवणी हे मोहा गावठी दारू कांढळी येथे नेत असल्याचे आढळून आले. त्यांना थांबवून दोन प्लास्टिक कॅनमधील १० हजार ५०० रुपयांची ७० लिटर मोहा दारू तथा दुचाकी असा ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर उब्दा शिवारात नाकाबंदी करण्यात आली. या धाडीत नेहाल बंडू भाजीपाले, राजू उर्फ रजया देवतळे दोन्ही रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट हे कार क्र. एमएच ०२ एयू ५८५३ मध्ये मोहा गावठी दारूची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. थांबण्याचा इशारा करताच चालक राजू देवतळे गाडी उभी करून पसार झाला. नेहालला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २० रबरी ब्लाडरमधील ४०० लिटर मोहा दारू ४० हजार तथा कार असा ३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश इंगोले, कडू, अजय अवचट, शिपाई राहुल गिरडे, संजय सूर्यवंशी, यशवंत गोल्हर आदींनी केली.