कारसह ४.४७ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:05 AM2018-12-20T00:05:25+5:302018-12-20T00:05:44+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुलगावकडून दहेगाव मार्गे वर्धेकडे दारूसाठा आणल्या जात असल्याची माहिती मिळताच सावंगी परिसरात नाकेबंदी करण्यात आली. काही वाहनांची पाहणी केल्यावर या वाहनात दारूसाठा आढळून आला. वाहनातील अविनाश यादव (२६) याला ताब्यात घेवून त्याच्याजवळून वाहनासह एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निरंजन वरभे, संजय ठोंबरे, राकेश आष्टनकर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, गणेश खेवले यांनी केली.
साहूर पारधी बेड्यावर ‘वॉश आऊट’
आष्टी (शहीद) : साहुर येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू अवैधरित्या तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती ठाणेदार रेवचंद्र सिंगनजुडे यांना मिळाली. त्या आधारे आष्टी पोलिसांच्या चमुने साहुरच्या पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोहरसायन सडवा व गावठी दारू नष्ट करून दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आष्टी तालुक्यात गेल्या काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकल्या जात होती. मात्र, ठाणेदार सिंगनजुडे रूजू झाल्यावर त्यांनी या अवैध दारूविक्रीला आळा घातल्याचे दिसते. वारंवार धाडी टाकून दारूविक्रेत्यांना धडा शिकवला. पुन्हा दारूविक्रीचा व्यवसाय आपले पायमुळ घट्ट करू पाहत असल्याचे निदर्शनास येताच आष्टी पोलिसांनी सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी साहुर पारधी बेड्या येथील प्रकाश भोसले (५२) यांच्यावर दारूविक्री प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक डी. एस. केकन, राजू दहिलेकर, विनोद वरहारे, महेंद्र अंबुडारे, रवींद्र रघाटाटे, खोमदेव वैरागडे, विलास राठोड, निलेश वंजारी, नंदकिशोर वाढवे, बाबासाहेब गवळी, निखिल वाणे यांनी केली.