४७ घरांवर चालला बुलडोजर
By admin | Published: May 30, 2014 12:16 AM2014-05-30T00:16:32+5:302014-05-30T00:16:32+5:30
रस्ता रूंदीकरणाच्या नावावर गुरुवारी गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात गावातील घरे व दुकाने अशा एकूण ४७ इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आला.
अनेक कुटुंब आले उघड्यावर : चोख पोलीस बंदोबस्तात राबविली मोहीम
तळेगाव (टालाटुले) : रस्ता रूंदीकरणाच्या नावावर गुरुवारी गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात गावातील घरे व दुकाने अशा एकूण ४७ इमारतीवर बुलडोजर चालविण्यात आला. अनेकांच्या डोक्यावरील छत गेले तर अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आले. ही अतिक्रमण हटाव मोहीम राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
येथून जाताना ठिकठिकाणी वाहनांची कोंडी होत असल्याच्या कारणाने रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आली. ज्यांचे अतिक्रमण आहे. त्यांनी ते स्वत: काढावे, अशा सूचना बांधकाम विभागाच्यावतीने पूर्वीच करण्यात आल्या. यामुळे दचकलेल्या गावकर्यांनी बांधकाम विभागाला ही कारवाई थांबविण्याकरिता निवदेन दिले. यावेळी पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचे आश्वासन अभियंत्याने देताच आंदोलन मागे घेतले. लगेच दुसर्या दिवशी बांधकाम विभागाची यंत्रणा गावात आली. नंतर अधिकारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास आली. यावेळी झालेले चर्चेनंतर अधिकारी गावातून निघून गेले.
अचानक गुरुवारी सकाळी ९ वाजता पोलिसांचा ताफा आला. नंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आले. ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अतिक्रमणधारकांपैकी एकानेही आपले साहित्य काढले नव्हते त्यामुळे जेसीबी लागताच कुणी घरावरील टिन काढू लागले तर कुणी घरातील साहित्य काढत होते. अनेकांच्या घराते शेतीसाहित्यही होते. अतिक्रमण काढण्याकरिता महसूल विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता अय्यर, उपभियंता गिरी, आचार्य, तहसीलदार व पोलीस हजर होते.(वार्ताहर)
अनेकांच्या डोळ्यात अश्रू
अतिक्रमणात ज्यांचे घर व दुकान पडले ते डोळ्यात आसवे असताना सुद्धा काही बोलू शकले नाही. ज्यांचे अतिक्रमण नाही. ते बरे झाले अतिक्रमण पडले, यामुळे रस्ता मोकळा झाला असे बोलत होते.
कर्ज घेऊन बांधले घर, उभारली दुकाने
अनेकांनी घर बांधण्यासाठी व दुकान थाटण्यासाठी कर्ज घेतले होते. या अतिक्रमण हटाव मोहिमेत घर व दुकाने पडल्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहे.
अधिकार्यांना हवा होता सहा मीटर रस्ता
अधिकार्यांना रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने सहा सहा मीटर रस्ता हवा होता. त्यामुळे त्यांनी येताच मोजणी केली व लगेच घरे तोडायला सुरूवात केली. काहींचे निशान केलेल्या जागेपेक्षा जास्त पडले तर काहींचे कमी.